जाणकारातूनही ‘जर-तर’ची भाषा!
By Admin | Updated: October 8, 2014 00:48 IST2014-10-08T00:26:16+5:302014-10-08T00:48:28+5:30
जालना : लोकसभा निवडणुकीची गणिते या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: बिघडल्याने राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तिसुध्दा आता ‘जर-तर’ ची भाषा बोलू लागले आहेत.

जाणकारातूनही ‘जर-तर’ची भाषा!
जालना : लोकसभा निवडणुकीची गणिते या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: बिघडल्याने राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तिसुध्दा आता ‘जर-तर’ ची भाषा बोलू लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस-आघाडी विरुध्द महायुतीत जोरदार टक्कर होईल, असे अपेक्षित होते. राजकीय क्षेत्रातील जाणकार सुध्दा सत्तारुढ आघाडी विरोधात वातावरण असल्याचा निर्वाळा देत होते. परंतू महायुती मोठ्या मताधिक्याने मुसंडी मारेल, हे सांगण्यास धजावत होते. या पार्श्वभूमीवरच त्या निवडणुकीत ‘मोदी’ लाटेत कॉँग्रेस जणांचा अक्षरश: सफाया झाला. त्या लाटेवर महायुतीचे उमेदवार सहजपणे स्वार झाले. एकूण ते निकाल कॉँग्रेसजणांना धक्कादायक ठरलेच; परंतु, राजकीय क्षेत्रातील जाणकार सुध्दा चक्रावून गेले होते.
गेल्या सहा महिन्यापूर्वीच्या निकालांचे सादपडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतील, असा महायुती समर्थक , तर सहा-सहा महिने ‘मोदी’ लाट टिकणार नाही, असा कॉँग्रेस समर्थकांतून सूर उमटत होता. परंतु, महायुती व आघाडीत अनपेक्षितपणे फुट पडल्यानंतर मातब्बर उमेदवारांचे तोंडचे पाणी तर पळालेच; त्याबरोबर राजकीय क्षेत्रातील जाणकारांना सुध्दा हादरा बसला. महायुती व आघाडी यांच्यातच पारंपारिक लढती रंगतील, असा सूर आवळणाऱ्या जाणकारांनी लगेच सावधपणे मौनी भूमिका स्वीकारल्या. लोकसभेची गणिते या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: बिघडल्याने राज्यासह या जिल्ह्यात सुध्दा प्रत्येक मतदारसंघात दुरंगी लढती बहुरंगी झाल्या आहेत. लढती बेरंग झाल्यानेच गोंधळावस्था निर्माण झाली आहे. कारण पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांबरोबर आता कालपर्यंतचे मित्र सुध्दा दंड थोपाटून उभे राहिल्याने मतविभागणीचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
विशेषत: कोण कोणाच्या व्होट बॅँकेवर डल्ला मारेल, हे सांगणेच आता कठीण बनले आहे. प्रत्येक निवडणुकीत आपापल्या व्होट बॅँका समर्थपणे सांभाळणाऱ्या मातब्बरांना आता मित्र पक्षांचाच मोठा धसका आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत गळ्यात गळे घालून, पडद्याआड निरनिराळ्या युक्त्या व डावपेच खेळून एकगठ्ठा मतदानासाठी प्रयत्न केलेल्या मित्रपक्षांना आता मित्रांच्याच ‘कुटीरउद्योगा’ला म्हणजेच मतांच्या पळवापळवीला रोख बसविण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. आपल्या हक्काचे प्रत्येक मत पदरात पाडून घेतांना विरोधी पक्षाच्याही व्होट बॅँकेवर डल्ला मारण्याकरिता नामी युक्त्या शोधाव्या लागणार आहेत. कालपर्यंतच्या महायुतीतील शिवसेना-भाजप तर राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसचीही पारंपारिक व्होट बॅँक एकच आहे. त्यामुळेच मतांसाठी या चौघाही प्रतिस्पर्ध्यात चांगली रस्सीखेच रंगली आहे. त्यासाठी मातब्बरांसह नवख्याही उमेदवारांनी तन-मन-धनासह प्रतिष्ठाही पणास लावली आहे. या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत बदनापूर मतदार संघाने महायुतीस विक्रमी असे मताधिक्य दिले होते. तेथूनच महायुतीचा आत्मविश्वास उंचावला होता. दुर्दैवाने महायुतीत फुट पडली. त्यातील दोन्ही पक्ष समोरा समोर उभे राहिले. परिणामी जुनी गणिते अक्षरश: गळून पडली. आता स्वबळावर म्हणजे ‘ताकद’च दाखविल्याशिवाय पर्याय नाही. हे कालपर्यंतच्या महायुतीतील दोन्ही उमेदवारांना कळून चुकले आहे.
त्यामुळेच उमेदवारी आता सावध पवित्रा स्वीकारला असून ते कुठेही बेताल विधाने करीनासे झाले आहेत. कोणालाही न दुखवण्याचे काम ग्रामीण भागात प्राधान्याने सुरु असून त्यामुळे या लढतीचे चित्रच बदलले आहे. (प्रतिनिधी)