भूमापक मेटे लाच घेताना सापळयात
By Admin | Updated: December 3, 2014 01:15 IST2014-12-03T01:02:19+5:302014-12-03T01:15:30+5:30
जालना : येथील तालुका भूमीअभिलेख कार्यालयातील भूमापक कौतिकराव सांडू मेटे याला ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

भूमापक मेटे लाच घेताना सापळयात
जालना : येथील तालुका भूमीअभिलेख कार्यालयातील भूमापक कौतिकराव सांडू मेटे याला ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. हा प्रकार २ डिसेंबर रोजी दुपारी २.४० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चहा टपरीजवळ घडला.
न.भू.मा.क्र. ७८२६ या मालमत्तेचे वारस मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांच्या नावावर ही मालमत्ता करून देण्यासाठी तालुका भूमीअभिलेख कार्यालयात प्रस्ताव दिला होता. त्यासाठी आवश्यक असणारी सर्वच कागदपत्रे दिली. मात्र तीन महिने उलटूनही मेटे यांनी प्रतिसाद दिला नाही. यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सुधारित पी.आर. कार्ड संदर्भात विचारणा केली. त्यासाठी ५ हजार रूपये लाचेची मागणी केली. ही रक्कम घेऊन २ डिसेंबर घेऊन येण्याचे सांगितले. मात्र तडजोड होऊन ४ हजार रूपये देण्याचे फिर्यादीकडून मान्य करण्यात आले. त्यातील ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक व्ही.बी. चिंचोले, एस.एम. मेहेत्रे, अशोक टेहरे, संतोष धायडे, नंदू शेंडीवाले, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, संजय उदगिरकर, प्रदीप उबाळे, संदीप लव्हारे, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे व संजय राजपूत यांनी केली. (प्रतिनिधी)