पाणंद रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
By Admin | Updated: September 13, 2014 23:04 IST2014-09-13T22:56:31+5:302014-09-13T23:04:03+5:30
पुसेगाव : जोडरस्त्याच्या कामाकडे प्रशासनाने आतापर्यंत लक्ष दिलेले नाही.

पाणंद रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव ते हनकदरी- खिल्लार या जोडरस्त्याच्या कामाकडे प्रशासनाने आतापर्यंत लक्ष दिलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
पुसेगाव येथील जवळपास ३०० शेतकरी वापरत असलेला पुसेगाव-हनकदरी- खिल्लार हा पारंपरिक पाणंद रस्ता आहे. शेतामध्ये जाण्यासाठी त्यांना पर्यायी रस्ताच उपलब्ध नाही. शेतकऱ्यांना आपली जनावरे, कृषी औजारे व बी-भरण गाडीबैलाने याच रस्त्याने न्यावे- आणावे लागते. पावसाळ्यामध्ये दरवर्षी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होते. त्यामुळे बैलगाडीच काय पायीही चालता येत नाही. अशा स्थितीत रस्त्यालगतच्या काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. २००७ पासून पुसेगाव येथील शेतकरी सदरील रस्त्याच्या मागणीसाठी प्रशासनासाठी निवेदने देवून पाठपुरावा करीत आहेत. दरम्यान २०१० मध्ये सेनगावच्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देवून सदर रस्त्याच्या कामाबाबत कार्यवाहीचे आदेश दिले होते. परंतु तहसीलदारांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. तसेच २०१३ मध्ये पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडेही ग्रामस्थांनी आपली कैफियत मांडली. याशिवाय लोकप्रतिनिधींकडेही सदर रस्त्याचा प्रश्न मांडण्यात आला. परंतु शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने संबंधितानी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून पुसेगाव- खिल्लार पाणंद रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा पुसेगाव येथील बळीराम गणपत धाबे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी पुसेगाव येथे अचानक भेट देवून ग्रा.पं.च्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी सदर पाणंद रस्त्याच्या दुर्लक्षित कामामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला होता.(वार्ताहर)