मयताच्या नावावरील जमीन विकली

By Admin | Updated: September 3, 2014 00:20 IST2014-09-03T00:12:33+5:302014-09-03T00:20:07+5:30

वैजापूर : तोतया मालक बनून खरेदीखताद्वारे विक्री करण्याचा प्रकार सवंदगाव येथे उघडकीस आला

Land sold on the name of his mother | मयताच्या नावावरील जमीन विकली

मयताच्या नावावरील जमीन विकली

वैजापूर : मयत झालेल्या नातेवाइकाच्या नावावर असलेली १ हेक्टर २८ आर शेतजमीन तोतया मालक बनून खरेदीखताद्वारे विक्री करण्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील सवंदगाव येथे उघडकीस आला आहे.
या प्रकरणी अरुण भाऊसाहेब कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर कदम, अजिनाथ कदम, लता कदम, विनायक अंभोरे (रा. सवंदगाव) व पंकज घोलप (रा. कोपरगाव) या पाच जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल असलेल्यांपैकी अजिनाथ कदम व लता कदम या दोघांना अटक केली असून, अन्य आरोपी फरार आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगाव, जि. अहमदनगर येथील दीपक शेषराव घोलप यांची वैजापूर तालुक्यातील सवंदगाव शिवारातील गट क्र. २०२ मध्ये १ हेक्टर २८ आर शेतजमीन आहे. दीपक यांचे आजाराने ४ मे २०१२ रोजी कोपरगाव येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांची ५ वर्षांची मुलगी स्नेहा ही शेतजमिनीची वारसाहक्काने मालक होणार होती; मात्र दीपक याची ही शेतजमीन बळकाविण्याच्या उद्देशाने किशोर कदम याने दीपक घोलपचे नाव व स्वत:चा फोटो लावून बनावट वाहनचालक परवाना तयार केला. या वाहनचालक परवान्याच्या आधारे किशोर याने २० जुलै २०१२ रोजी वैजापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मयत दीपक हा आपण असल्याचे भासवून त्याच्या नावावर असलेली १ हेक्टर २८ आर शेतजमीन आपली आई लता कदम यांना खरेदीखत क्रमांक ३५०३११२ द्वारे विक्री केली. या व्यवहारासाठी त्याचे वडील अजीनाथ कदम व गावातीलच विनायक अंभोरे या दोघांनी किशोर हाच दीपक असल्याचे खोटे सांगून खरेदीखतावर साक्षीदार म्हणून सह्या केल्या. तसेच मयत दीपक याचा भाऊ पंकज यानेही या व्यवहारास संमती दिली. या खरेदीखताच्या आधारे किशोर कदम याने फेरफार करून या शेतजमिनीच्या सातबारावर आई लता कदम हिच्या नावाची नोंदही करून घेतली. तसेच या सातबारावर त्यांनी औरंगाबाद येथील एका पतसंस्थेकडून ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्जही उचलले होते; मात्र या कर्जाची परतफेड न करता त्यांनी ही जमीन विक्री केली. जमिन विक्रीची कुणकुण लागल्याने मयत दीपक याचे नातेवाईक अरुण कदम यांनी दुय्यम निबंधक कार्यालय व तलाठी कार्यालयात चौकशी केली असता त्यांना हा प्रकार समजला.
या प्रकारामुळे वैजापूर दुय्यम निबंधक कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील काळात बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याप्रकरणी तत्कालीन तीन दुय्यम निबंधक, दोन दस्तलेखक व अन्य एक अशा एकूण सहा जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी करून २००६-२०११ या कालावधीत तालुक्यातील विविध प्रकल्पांच्या लाभक्षेत्राचे बनावट प्रमाणपत्र जोडणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते; मात्र एकाएकी ही कारवाई थंड बस्त्यात गुंडाळली गेली.
फिर्यादी अरुण भाऊसाहेब कदम हा आरोपी किशोर याचा नात्याने चुलतभाऊ आहे. आपल्याच चुलतभावाने मयत नातेवाइकाच्या नावावरील शेतजमीन विक्री केल्याचे समजल्यावर अरुण याने या प्रकरणाचा पर्दाफाश करून पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

Web Title: Land sold on the name of his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.