देवळाईत म्हाडाला जमीन
By Admin | Updated: September 12, 2014 00:30 IST2014-09-12T00:23:55+5:302014-09-12T00:30:33+5:30
औरंगाबाद : देवळाई परिसरात म्हाडाच्या गृहप्रकल्पासाठी शासनाने १८ हेक्टर गायरान जमीन देण्यास मंजुरी दिली होती.

देवळाईत म्हाडाला जमीन
औरंगाबाद : देवळाई परिसरात म्हाडाच्या गृहप्रकल्पासाठी शासनाने १८ हेक्टर गायरान जमीन देण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार म्हाडाने १८ पैकी १० हेक्टर जमिनीच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा केली आहे. त्यामुळे ही जमीन लवकरच म्हाडाच्या ताब्यात दिली जाणार आहे. याठिकाणी लघु व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांचा भव्य प्रकल्प उभारणार असल्याची माहिती म्हाडाच्या सूत्रांनी दिली.
शहरालगत गृहप्रकल्प उभारण्यासाठी म्हाडाने मोठ्या प्रमाणावर नियोजन सुरू केले आहे. या प्रकल्पांसाठी शहरालगत विविध ठिकाणी गायरान जमीन मिळावी याकरिता म्हाडाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत.
त्यापैकी देवळाई भागातील १८ हेक्टर गायरान जमिनीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने फेबु्रवारी महिन्यात मंजुरी दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने २६ जून रोजी त्यासंदर्भातील आदेश जारी केला. शासनाने देवळाईच्या गट क्रमांक १४५ मधील ८ हेक्टर व गट क्रमांक ७३ मधील १० हेक्टर जमीन देण्यास मान्यता दिलेली आहे. म्हाडाला लवकरच जमिनीचा ताबा दिला जाणार आहे.
म्हाडाने १८ हेक्टर गायरान जमिनीपैकी १० हेक्टर ७९ आर जमिनीचा मोबदला जिल्हा प्रशासनाकडे जमा केला आहे. गट क्रमांक ७३ मधील ६ हेक्टर ४ आर आणि गट क्रमांक १४५ मधील ४ हेक्टर ७५ आर जमिनीच्या मोबदल्यापोटी म्हाडाने १८ कोटी ५७ लाख रुपये इतकी रक्कम जमा केली आहे.
उर्वरित ७ हेक्टर २१ आर जमिनीचे मूल्यांकन भरणे बाकी आहे. म्हाडाने मूल्यांकनाची रक्कम जमा करताच त्यांच्याकडे गायरान जमिनीचा ताबा दिला जाणार आहे.