पालिकेच्या जागांवर भू-माफियांचा डोळा
By Admin | Updated: January 3, 2016 23:53 IST2016-01-03T23:26:02+5:302016-01-03T23:53:53+5:30
रवी गात , अंबड शहरातील नगर पालिका प्रशासनाच्या मालकीच्या मोकळ्या जागांवर काही भू- माफिया परस्पर विल्हेवाट लावत असल्याचे चित्र आहे.

पालिकेच्या जागांवर भू-माफियांचा डोळा
रवी गात , अंबड
शहरातील नगर पालिका प्रशासनाच्या मालकीच्या मोकळ्या जागांवर काही भू- माफिया परस्पर विल्हेवाट लावत असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या कोट्यवधी रूपयांचा मोकळ्या जागांवर भू-माफियांनी खाजगी सांगून त्याची वाट लावणे सुरू केले आहे.
शहरातील अनेक मोक्याच्या जागांवर पक्की बांधकामे केल्याने त्या-त्या वसाहतीतील क्रीडांगण, उद्याने व वृध्दांसाठीच्या नाना-नानी पार्कच्या जागा गायब झाल्या आहेत. मात्र याविषयी तक्रार केल्यास धार्मिक भावना दुखावल्याचा कागांवा करणाऱ्या जमावाला तोंड द्यावे लागेल या भीतीने सामान्य नागरिक याविषयी केवळ दबक्या आवाजात आपली नाराजी व्यक्त करत आहेत. सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा येत असली तरी पालिकेला काहीएक सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. अद्यापपर्यंत एकाही पक्ष वा संघटनेने आवाज उठविण्याचे धाडस केलेले नाही. आधीच भुखंड माफियांच्या कारवायांनी जेरीस आलेल्या पालिका प्रशासनासमोर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. शहरात एकूण ६३ ले-आऊट आहेत. ७० ठिकाणी ओपन प्लेस आहेत. अंबड पालिकेच्या जमिनीवर ताबा मिळविणे, त्यावर परस्पर प्लॉटिंग पाडणे व त्या प्लॉटची विक्री करुन कोट्यवधींचा मलिदा लाटणे असा प्रकार सर्रास सुुरु आहे. याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असलेले सामान्य नागरिक स्वस्तात प्लॉट मिळत असल्याच्या लालसेने अशा प्रकारचे बेकायदेशीर प्लॉट खरेदी करतात व त्यावर बांधकाम करतात. शहरात मोठया संख्येने अवैध बांधकामे झाली आहेत. पालिका प्रशासनाच्या ले-आऊट मधील बहुतांश भूखंडावर अतिक्रमण झाल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली.
काही महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने वेगवेगळया नोटीस जारी करुन कारवाई करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खुप उशीर झाला होता. अनेक ठिकाणच्या ओपन प्लेसवर नोटरी करुन बांधकामे करण्यात आलेली आहे. या अतिक्रमित बांधकामांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयी वेळोवेळी पालिका प्रशासनाला आदेशही जारी केले आहेत.