लाखात झाली मनधरणी
By Admin | Updated: June 23, 2017 01:05 IST2017-06-23T01:04:23+5:302017-06-23T01:05:18+5:30
औरंगाबाद : जनसुविधा कार्यक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी तीन गटनेते व काही मोजक्या सदस्यांना ४० लाखांच्या वरच निधी वाटप करण्यात आला आहे.

लाखात झाली मनधरणी
विजय सरवदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपल्या भूमिकेला विरोध करू नये, यासाठी राजकीय पक्षांचे गटनेते व सभागृहाला धारेवर धरणाऱ्या काही मोजक्या सदस्यांना लाखो रुपयांच्या निधीचे ‘गिफ्ट’ देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न अध्यक्षांकडून झाला असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे. जनसुविधा कार्यक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी तीन गटनेते व काही मोजक्या सदस्यांना ४० लाखांच्या वरच निधी वाटप
करण्यात आला आहे. दरम्यान, अध्यक्षांच्या या भूमिकेमुळे जि. प. सदस्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे.
अलीकडे जि. प. अध्यक्षांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांचा अध्यक्षांच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे. त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रशासन आणि सदस्यही नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची अडीच वर्षे पार पाडण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांचे गटनेते तसेच सभागृहाला धारेवर धरणाऱ्या काही मोजक्या सदस्यांना लाखो रुपयांच्या निधीचे ‘गिफ्ट’ देऊन त्यांची ‘बोलती’ बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सदस्य सांगतात.
जनसुविधा योजनेतून स्मशानभूमी शेड, कब्रस्तानसाठी संरक्षक भिंत आणि ग्रामपंचायत इमारत ही तीनच कामे करता येतात. यासाठी ‘डीपीडीसी’कडून मार्चपूर्वीच जिल्हा परिषदेला निधी मिळाला आहे. मात्र, प्राप्त निधीचे नियोजन अलीकडे करण्यात आले. यासंबंधी काही सदस्यांनी आक्षेप घेतला तेव्हा ग्रामपंचायतींकडून यासंबंधी प्रस्ताव आले होते. त्यानुसार नियोजन केल्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाले आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडून अलीकडे तसे प्रस्ताव तयार करून घेण्यात आल्याचा आरोप मनसेचे सदस्य विजय चव्हाण यांनी केला आहे.