सात कुटुंबांना लाखाची मदत
By Admin | Updated: November 15, 2014 23:54 IST2014-11-15T23:53:31+5:302014-11-15T23:54:57+5:30
हिंगोली : मागील काही दिवसांत जिल्ह्यात पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्षभरात जवळपास २५ ते ३0 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सात कुटुंबांना लाखाची मदत
हिंगोली : मागील काही दिवसांत जिल्ह्यात पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्षभरात जवळपास २५ ते ३0 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या महिन्यात शेतकरी आत्महत्या समितीसमोर मदतीसाठी आलेल्या प्रस्तावांपैकी ७ मंजूर झाले असून त्यांच्या कुटुंबियांना लाखाची मदत मिळणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.
जिल्ह्यातील एकूण ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत कुटुंबियांना मदतीसाठी प्रस्ताव तहसील प्रशासनाकडून सादर करण्यात आले होते. जिल्हास्तरीय समितीने केलेल्या तपासणीअंती त्यातील ७ प्रस्ताव मदतीसाठी पात्र ठरले आहेत. यात औंढा नागनाथ तालुक्यातील पार्डी सावळी येथील डिगांबर किशन सांगळे, माथा येथील उमराव मारोतराव कुटे, अनखळी वाडी येथील संपत मारोतराव चाटे, पार्डी सावळी येथील सोपान किशनराव सांगळे, कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील विठ्ठल जगदेवराव माने, सेनगाव तालुक्यातील खुडज येथील नवनाथ विश्वनाथ घोशिर, वसमत तालुक्यातील दारेफळ येथील माणिक उमाजी भालेराव या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. नापिकी व कर्जाच्या तगाद्याला कंटाळून या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना लाखाची मदत दिली जाणार आहे. यासाठी सात लाखांची मदत जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित तहसीलला धनादेशाद्वारे पाठविण्यात आली आहे. ३0 हजारांची थेट मदत व ७0 हजार रुपये पोस्टाद्वारे टप्प्या-टप्प्याने दिले जातात. आणखी दोन आत्महत्याग्रस्तांचे प्रस्ताव समितीसमोर चर्चेला आले होते. मात्र त्यातील एक अपात्र ठरले तर दुसरे फेरतपासणीसाठी ठेवण्यात आले आहे.(वार्ताहर)