डाळ प्रक्रिया उद्योगातून लाखांची उड्डाण
By Admin | Updated: July 2, 2014 00:32 IST2014-07-01T23:50:24+5:302014-07-02T00:32:14+5:30
भास्कर लांडे , हिंगोली स्वत:च्या बळावर, कृषी विभागाच्या प्रेरणेने पापड, लोणच्याच्या पुढे पाऊल टाकीत येहळेगाव तुकाराम येथील आम्रपाली महिला बचत गटाने डाळ उद्योगाची यशस्वी मुहूर्तमेढ रोवली.

डाळ प्रक्रिया उद्योगातून लाखांची उड्डाण
भास्कर लांडे , हिंगोली
स्वत:च्या बळावर, कृषी विभागाच्या प्रेरणेने पापड, लोणच्याच्या पुढे पाऊल टाकीत येहळेगाव तुकाराम येथील आम्रपाली महिला बचत गटाने डाळ उद्योगाची यशस्वी मुहूर्तमेढ रोवली. तेवढ्यावर न थांबता महिलांना मार्चपासून ते जुलैै २०१४ पर्यंत साडेचार लाखांपर्यंत टर्नओव्हर नेला. आलेला पैैसा पतीच्या हातात न देता दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी वापरण्याचा निर्धार केला. अल्पावधीतच लाखोंची उड्डाण घेणाऱ्या या बचत गटाकडे आजघडीला १०० क्विंटल डाळीची आॅफर आली. पैैशासाठी पतीवर निर्भर असणाऱ्या या महिलांचे खऱ्या आर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण घडून आल्याचे दिसून येत आहे.
बचतगटाची संकल्पना पुढे येवून बराच कालावधी लोटला; परंतु आजही महिला बांगड्या, साड्या, पापड, लोणच्याच्या पुढे गेल्या नाहीत. परिणामी आर्थिक सुबत्ता आली नसल्याने हळूहळू बचत गट मोडकळीस येवू लागले. सरसगट बचत गटांना उतरती कळा लागली असताना येहळेगाव (तुकाराम) येथील आम्रपाली बचत गटाने लाखांची उड्डाणे घेतली. २००४ साली पाच महिलांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या या गटात आजघडीला सदस्यांची संख्या दोन अंकी झाली. त्यात अध्यक्षा-शशीकला पतींगराव, सचिव-सुलोचना नरवाडे, सदस्या-रूख्मीनबाई पतींगराव, सुमन शिंदे, रंजना पतींगराव, माया नरवाडे, जोत्स्ना कळसे, भागीरथबाई काळे आदींचा समावेश आहे.
सुरूवातीपासून मोठे ध्येय ठेवून या गटाने ग्रामीण भागात शौच्छालय उभारण्याची कामे घेतली. दरम्यान व्यवसायाच्या दृष्टीने ट्रॅक्टर घेवून भांडवल जमविले; पण फिरत्या व्यवसायापेक्षा गावातच राहून वेगळे करण्याची धारणा गटातील महिलांची होती. २००४ पासून दारिद्र रेषेत असलेल्या हा गट २०१३ वर्षी कृषी विभागाशी जोडला गेला आणि नव उद्योगाची माहिती होत गेली. एकदा डाळ उद्योगाच्या प्रशिक्षणाला गेलेल्या या महिलांनी या उद्योगात पाऊल टाकण्याचा निर्धार केला. गटाच्या संकल्पनेला राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व गतीमान कडधान्य योजनेने मूर्त स्वरूप मिळाले.
५० टक्के अनुदानावर येळेगावात महिलांनी डाळ प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. भांडवलाचा अभाव असतानाही महिलांनी तडजोड करीत कार्य सिद्धीस नेले. पूर्वीच्या कामानिमित्त वाढलेला जनसंपर्क तसेच गावागावात लावलेला बोर्ड, महिलांनी केलेला प्रचारामुळे डाळमिलची माहिती सर्वांना झाली. जिल्ह्यातील तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील प्रदर्शनीसह मार्केटींग माहिती तालुका कृषी अधिकारी डी. बी. काळे यांच्याकडून मिळाली. उद्योगाची स्थापना आणि व्यवसायाबद्दल वारंवार मार्गदर्शनही मिळाल्याचे गटाच्या अध्यक्षा सुलोचना नरवाडे यांनी सांगितले. वर्षभर लागणारी तूर, मूग, उडीद आणि हरभऱ्याच्या डाळीसाठी गावागावातून शेतकरी येवू लागले. ऐकमेकांमुळे माहितीचा प्रसार झाल्याने मार्चपासून जुनपर्यंत ३०० क्विंटल डाळ करण्यात आली. शेतकऱ्यांना ५०० रूपयांच्या क्विंटलाप्रमाणे डाळ करून दिली; पण कायमस्वरूपी स्त्रोताचा विचार करीत विविध कडधान्यांची १ हजार क्विंटल डाळ तयार करण्यात आली. मार्केटिंगचे प्रशिक्षण तसेच अनुभव नसताना अवघ्या चारच महिन्यात महिलांनी १ हजार क्विंटल डाळीची विक्री केली. आॅर्डरप्रमाणे डाळ मिळत असल्याने परजिल्ह्यातून मागणी वाढली. स्वच्छ, उत्तम आणि मागणीप्रमाणे मालाच्या हमीमुळे नांदेड येथील सुपर मार्केटकडून ६० क्विंटल तूर आणि ३० क्विंटल हरभऱ्याच्या डाळीची आॅफर आली. मिल टाकून काही महिने लोटले असताना कोटीच्या उड्डाणाकडे महिलांनी झेप घेतली. उद्योगाच्या पूर्वज्ञानाचा अभाव, मार्केटींग तसेच संवाद कौशल्य, भांडवल, विक्री आदी दिव्य पार करीत ग्रामीण भागीतल महिला यशस्वा झाल्या. सर्व बाबी असताना नोकरीच्या नावाने बोंब मारणाऱ्या सुशिक्षत बेरोजगारांसाठी हा गट आदर्श ठरला. प्रत्येक गोष्टीसाठी पतीकडे हात पसरविणाऱ्या या महिलांकडे आज आर्थिक सुबत्ता आली. डाळमीलच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरन घडून आले.
खऱ्या अर्थाने सक्षमीकरण
डाळ उद्योगाच्या प्रशिक्षणाला गेलेल्या या महिलांनी या उद्योगात पाऊल टाकण्याचा केला होता निर्धार.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व गतीमान कडधान्य योजनेतून ५० टक्के अनुदानावर येळेगावात महिलांनी रोवली डाळ उद्योगाची मुहूर्तमेढ.
बचत गट झाला सक्षम