‘लई मजबूत भीमाचा किल्ला’
By Admin | Updated: April 15, 2015 00:41 IST2015-04-15T00:38:48+5:302015-04-15T00:41:42+5:30
उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती मंगळवारी जिल्हाभरात उत्सवी वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने उस्मानाबादसह

‘लई मजबूत भीमाचा किल्ला’
उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती मंगळवारी जिल्हाभरात उत्सवी वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने उस्मानाबादसह गावागावांत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या.
जयंतीनिमित्ताने उस्मानाबाद शहरातील डॉ. आंबेडकर पुतळा येथे भीमसैनिकांनी पहाटेपासूनच अभिवादनासाठी गर्दी केली होती. गर्दीचा ओघ दिवसभर कायम होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास भीमनगरसह शहराच्या विविध भागातून जंगी मिरवणुकांना प्रारंभ झाला. या मिरवणुकांमध्ये हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी तसेच विविध स्तरातील नागरीक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
कळंब येथे डॉ. आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अशीच झुंबड उडाली होती. जयंतीनिमित्ताने येथे राबविण्यात आलेल्या अन्नदानाच्या उपक्रमात सुमारे अडीच हजारापेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. भूम येथील भीमनगरमध्ये झेंडावंदन आणि सामूहिक बुद्धवंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. जयंतीनिमित्ताने परंडा रोडवरील गुलाब गरड यांच्या शॉपींग सेंटरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपींग सेंटर असे नाव देण्यात आले. परंडा येथे सर्व पक्षीयांतर्फे यंदा एकच जयंती साजरी करण्यात येत आहे. जयंतीनिमित्ताने शहरातील विविध भीमनगरात ध्वजारोहण तसेच सामूहिक वंदनेचा कार्यक्रम झाला. डॉ. आंबेडकर चौकात झालेल्या मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला शहरवासियांसोबत ग्रामीण भागातूनही हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. उमरगा शहरातून चार जयंती मंडळांनी मंगळवारी मिरवणुका काढल्या. या मिरवणुकात तरुणांची संख्या लक्षणीय होती. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. लोहाऱ्यात जयंती उत्सव समिती व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील मुख्य चौकात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विविध मंडळांसोबतच जिल्हाभरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयातही आंबेडकर जयंतीची धामधूम सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, अरविंद लाटकर यांच्यासह अविनाश बोधवड, सचिन बारवकर उपस्थित होते.