लहुजी शक्तिसेनेचा तुळजापुरात अर्धनग्न मोर्चा
By Admin | Updated: July 2, 2014 00:22 IST2014-07-01T23:35:35+5:302014-07-02T00:22:46+5:30
तुळजापूर : विविध मागण्यांसाठी लहुजी शक्तीसेनेच्या वतीने मंगळवारी तुळजापुरात अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला़

लहुजी शक्तिसेनेचा तुळजापुरात अर्धनग्न मोर्चा
तुळजापूर : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, क्रांतीसूर्य लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा विधानभवन व संसद भवन परिसरात उभारावा आदी विविध मागण्यांसाठी लहुजी शक्तीसेनेच्या वतीने मंगळवारी तुळजापुरात अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला़
ढोल ताशांचा गजर आणि विविध जयघोषात लहुजी शक्तीसेनेच्या वतीने शहरातील विविध मार्गावरून तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला़ तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ यावेळी शिवाजी गायकवाड, विशाल कांबळे, सोमनाथ कांबळे, खंडू जाधव, पूजा देडे यांनी संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती दिली़ तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात तुळजापूर येथील सर्वे नं़ २१५ च्या शासकीय जागेत सद्यस्थितीत राहत असलेल्या समाजबांधवास जागेचा कबाला देऊन घरकुलाचा लाभ द्यावा, तुळजाभवानी मंदिर परिसरात दोरे, बांगड्या, विकणाऱ्या मातंग समाजातील तरूणांना अधिकृत पास व विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तुळजापूर, उस्मानाबाद येथे अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, पाटोदा येथील मातंग समाजास वीज, पाणी आदी जीवनावश्यक वस्तूंची सुविधा पुरवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे़ निवेदनावर राज्याध्यक्ष सोमनाथ कांबळे, जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, तालुकाध्यक्ष विशाल कांबळे, बालाजी गायकवाड, हेमंत पाटोळे, राजपाल लोखंडे, मुकेश देडे, सुमित कांबळे, बाळू देडे, नाना गायकवाड आदीची स्वाक्षरी आहे़ मोर्चात लहूजी शक्तीसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते़ (वार्ताहर)