माकणी धरणामध्ये उरला अत्यल्प साठा

By Admin | Updated: July 7, 2014 00:13 IST2014-07-06T23:20:56+5:302014-07-07T00:13:31+5:30

उमरगा : गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील ७२ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

Lack of valuable resources in Makani dam | माकणी धरणामध्ये उरला अत्यल्प साठा

माकणी धरणामध्ये उरला अत्यल्प साठा

उमरगा : गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील ७२ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे तालुक्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, चारा-पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. माकणी धरणामध्ये केवळ १३ दलघमी इतका साठा उरला आहे.
तालुक्याची पावसाची सरासरी ९५० मिमी असून, आतापर्यंत केवळ वीस मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे खरीप पेरणीची सर्वच यंत्रणा कोलमडली आहे. उष्णतेची दाहकता कायम असल्याने तालुक्यातील विहिरी, विंधन विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. तालुक्यातील पाझर तलाव, साठवण तलावातील पाणी आटल्याने पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
खरीप पेरणीसाठी खते व बी-बियाणे खरेदी करावयाची असल्याने शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत चालला असून, या रकमा आता कुठून द्यायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. काही शेतकऱ्यांनी उधारीवर खते, बियाणांची खरेदी करून ठेवली असून, यासाठीही व्यापाऱ्यांनी तगादा सुरू केला आहे. खरिपाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या किराणा, भुसार, कापड दुकानदारांची थकबाकीही वाढल्याने शेतकऱ्यांची बाजारातील पत संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. शिवाय चांगला पाऊस पडेल, या आशेवर व्यापाऱ्यांनीही बी-बियाणे, खते यासाठी लाखो रूपयांची गुंतवणूक केली. परंतु, हे साठे अद्यापही दुकानात तसेच पडून असल्याचे व्यापारी लक्ष्मीकांत माणिकवार यांनी सांगितले.
चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
पावसाने ओढ दिल्याने जलस्त्रोत कोरडे पडत आहेत. मागील दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या कडब्याचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे पशुधनांना जगविण्यासाठी शिवारात चारा-पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. आतापासून शेतकऱ्यांना प्रती पेंडी वीस रूपये दराने विकतची वैरण घेऊन आपल्या पशुधनाला जगविण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. (वार्ताहर)
७२ हजार हेक्टरवरील पेरणी खोळंबली
उमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी धरणात सध्या १३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, या धरणाची ५९८.५० इतकी पाणी पातळी आहे. वाढत्या उष्णतेमुळे व होणाऱ्या बाष्पीभवन व पाणी वापरामुळे या धरणातील पाणी पातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत चालली आहे. येत्या महिनाभरात धरण भरण्याइतपत पाऊस पडलाच नाही तर उमरगा शहरासह भूकंपग्रस्त ५२ गावांचा पाणीपुरवठा गंभीर होण्याची शक्यता असल्याचे शाखा अभियंता अनिल मुळे यांनी सांगितले. दरम्यान, उमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी, कोळसूर, कोरेगाव, तुरोरी या धरणातील पाणीसाठेही कमी होत असल्याने उमरगा शहराला आतापासूनच आठ दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
चाळीस गावांतील लोकांना टंचाईचे चटके
तालुक्यात ९६ पैकी ४० गावांत सध्या टंचाईची परिस्थिती आहे. चिंचोली (ज) येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, इतर ठिकाणाहूनही पंचायत समितीकडे अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

Web Title: Lack of valuable resources in Makani dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.