स्वपक्षीयावर भरोसा कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:42 IST2017-09-14T00:42:04+5:302017-09-14T00:42:04+5:30

गील महापालिकेत अवघे दोन सदस्य असलेल्या भाजपाने यंदा महापालिकेचा गड जिंकण्यासाठी लढण्याचे ठरविले आहे. मात्र शहरवासिय भाजपावर किती विश्वास ठेवतील याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेतेच साशंक असल्याचे चित्र आहे. बुधवारी भाजपाचे महापालिका प्रभारी कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी शहरात मेळावा घेतला. मात्र या दोन्ही नेत्यांचा दिवसभराचा पाहुणचारही संघ, भाजपाऐवजी इतर पक्षातील कार्यकर्त्यांकडेच होता.

Lack of trust | स्वपक्षीयावर भरोसा कमीच

स्वपक्षीयावर भरोसा कमीच

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मागील महापालिकेत अवघे दोन सदस्य असलेल्या भाजपाने यंदा महापालिकेचा गड जिंकण्यासाठी लढण्याचे ठरविले आहे. मात्र शहरवासिय भाजपावर किती विश्वास ठेवतील याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेतेच साशंक असल्याचे चित्र आहे. बुधवारी भाजपाचे महापालिका प्रभारी कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी शहरात मेळावा घेतला. मात्र या दोन्ही नेत्यांचा दिवसभराचा पाहुणचारही संघ, भाजपाऐवजी इतर पक्षातील कार्यकर्त्यांकडेच होता.
स्वबळ नसल्याने इतर पक्षातील नाराजांना आपल्याकडे खेचून त्यांच्या बळावर निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचे भाजपाचे धोरण आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच सेना-काँग्रेस व राष्ट्रवादी अशा एकूण १५ विद्यमान नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला असून बुधवारीही भाजपाचा हाच एककलमी कार्यक्रम सुरू होता. नांदेड शहरामध्ये आगमन झाल्यानंतर संभाजीराव पाटील निलंगेकर आणि आ. सुजितसिंह ठाकूर यांनी भाजप पदाधिकाºयांची भेट घेण्याअगोदर थेट शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे घर गाठले. वसंतनगर येथील चिखलीकरांच्या घरी चहापाणी झाल्यानंतर त्यांचा मोर्चा सुरेश गायकवाड यांच्या निवासस्थानाकडे वळला. तेथे पाहुणचार घेतल्यानंतर पुन्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनायक सगर यांच्या घरी भाजपाच्या या दोन्ही प्रमुख नेत्यांनी भेट दिली. त्यानंतर दुपारच्या सुमारास आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांचा पुतण्या अ‍ॅड. संदीप पाटील चिखलीकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. दुपारच्या सुमारास ओम गार्डन येथे झालेल्या पक्षप्रचार मेळाव्यात शिवसेनेचे दोन उपजिल्हाप्रमुख विनय सगर व गंगाधर बडुरे यांनी मित्रपक्ष सेनेला जय महाराष्ट्र ठोकत भाजपात प्रवेश केला. दरम्यान, दिवसभरात या नेत्यांनी इतर पक्षातून भाजपात आलेल्यांनाच अधिक महत्त्व दिल्याचे बुधवारी पुन्हा स्पष्ट झाले.
मेळाव्यातही भाजपाच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी मिळाली नसल्याची चर्चा मेळावास्थळी होती. माजी मंत्री डी. बी. पाटील, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश प्रवक्ता सुनील नेरलकर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर व्यासपीठावर होते तरीही त्यांची भाषणे होऊ शकली नाहीत. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. सुजितसिंह ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे सुरेश गायकवाड, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि डॉ. धनाजीराव देशमुख या पाच जणांनीच उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Web Title: Lack of trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.