वेगळ्या विदर्भासाठी समर्थ नेतृत्वाचा अभाव

By Admin | Updated: January 11, 2016 00:07 IST2016-01-10T23:58:35+5:302016-01-11T00:07:08+5:30

औरंगाबाद : विदर्भाकडे दीर्घकाळ राजकीय नेतृत्व होते. तरीदेखील विदर्भाचा विकास झाला नाही. राजकीय सत्ता एखाद्या प्रदेशाकडे असली म्हणजे

Lack of Loyal leadership for a different Vidarbha | वेगळ्या विदर्भासाठी समर्थ नेतृत्वाचा अभाव

वेगळ्या विदर्भासाठी समर्थ नेतृत्वाचा अभाव


औरंगाबाद : विदर्भाकडे दीर्घकाळ राजकीय नेतृत्व होते. तरीदेखील विदर्भाचा विकास झाला नाही. राजकीय सत्ता एखाद्या प्रदेशाकडे असली म्हणजे त्याचा विकास होतोच असे नाही. मध्यवर्ती सत्तेत दुबळेपणा असला की स्वतंत्र राज्याची मागणी रेटली जाते. स्वतंत्र राज्याची मागणी करीत असतानासुद्धा विदर्भाला समर्थ नेतृत्व मिळाले नाही, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उदारकला (लिबरल आर्टस्) विभाग आणि अमेरिकेतील ‘महाराष्ट्र स्टडीज ग्रुपतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र : प्लेस अँड स्पेस’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत रविवारी ते बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभ्यासक प्रा. जयंत लेले होते. यावेळी प्रा. सुहास पळशीकर, संयोजक डॉ. वि. ल. धारूरकर, समन्वयक डॉ. बीना सेंगर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. सुहास पळशीकर यांनी ‘महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई, विदर्भ विभागाचे स्थान’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. शोधनिबंधाचे सादरीकरण करताना ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर वेगळ्या विदर्भाचासुद्धा विषय चर्चेला आला. तेलंगणा हे स्वतंत्र राज्य निर्माण झाले. त्यानंतर पुन्हा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, विदर्भ वेगळे झाले, तरी त्याचा महाराष्ट्राच्या एकूण सर्वच परिस्थितीवर फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही. विदर्भाचे नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांना केवळ विदर्भाचेच पाठबळ आहे असेही नाही. त्यांना उर्वरित महाराष्ट्रातूनदेखील चांगले पाठबळ आहे. मुंबई आणि विदर्भ हे दोन्ही विषय भाषिक केलेले आहेत. मुंबईचे राजकारण भाषिक अस्मितेभोवती फिरविले जाते.
सायंकाळी या तीन दिवसीय परिषदेचा समारोप झाला. समारोप सत्रामध्ये ज्येष्ठ नाट्यकलावंत डॉ. मोहन आगाशे, आॅस्ट्रेलियाचे प्रा. जयंत लेले, अमेरिकेतील अ‍ॅरिझोन विद्यापीठाच्या प्रा. एन. एनसील, रशियातील मॉस्को विद्यापीठाच्या डॉ. एरिना रिस्कोवा, पतियाळा येथील वीरेंद्रपाल सिंग आदींची उपस्थिती होती. परिषदेचे संयोजक डॉ. वि. ल. धारूरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी नाट्यशास्त्र विभागातील प्रा. अशोक बंडगर लिखित ‘देवदासी’ एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. मोहन आगाशे यासंबंधी म्हणाले की, सामाजिक परिवर्तनासाठी पोषक अशी ही एकांकिका आहे. एकांकिकेच्या माध्यमातून प्रभावी संदेश देण्यात आला आहे, या शब्दात त्यांनी एकांकिकेची प्रशंसा केली. उपस्थितांचे आभार डॉ. बीना सेंगर यांनी मानले.

Web Title: Lack of Loyal leadership for a different Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.