परळी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर येथील वाण धरणातून अनधिकृत मोटारीद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा केला जात आहे. यामुळे धरणातील साठा घटत असून आगामी काळात शहराच्या पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहराची लोकसंख्या एक लक्ष असून नागापूर येथील वाण धरणातील पाण्यावर तहान भागविली जाते. धरणाची पाणी साठवण एकूण क्षमता १९.५ द.ल.घ.मी. असून शहरास वार्षिक २.५ द.ल.घ.मी आवश्यक असणारे पाणी आरक्षित आहे. सलग दुष्काळ, अवर्षणामुळे वाण धरणात गेल्या चार वर्षापासून मुबलक पाणीसाठा होऊ शकलेला नाही.शहरासोबतच वैद्यनाथ साखर कारखान्याचे १.० द. ल. घ. मी. आरक्षण देखील धरणावर आहे. यंदा कारखान्याने गाळप न करता उपलब्ध पाणी शहराकरीता राखून ठेवण्यासाठी सहकार्य करणे अपेक्षीत होते. मात्र गाळप सुरु असल्याने हा पाणी उपासाही सुरु आहे. यातच धरणामध्ये अनाधिकृत मोटारीद्वारे अवैध पाणीउपसा अविरत सुरू आहे.धरणातील पाणीसाठा केवळ ३.५ द.ल.घ.मी. एवढा असून त्यात मृतसाठा अधिक असण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीत मोठे जलसंकट परळीकरांसमोर उभे राहिले आहे. प्रशासनाने सलग अवर्षण होत असून देखील सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली येवून १ द.ल.घ.मी. म्हणजे शहरास सहा महिने पिण्यासाठी मुबलक होईल इतके पाणी जनावरांना पिण्यासाठी हे कारण पुढे करून धरणातून सोडले आणि ऊस वाचवला. एक लक्ष लोकसंख्या असणाऱ्या शहरास येत्या पावसाळ्यापर्यंत वाण धरणातील पाणी पुरणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
नागापूर धरणातून अवैध पाणी उपसा
By admin | Updated: December 28, 2015 23:25 IST