ढोकी परिसरात अवैध धंद्याला ऊत
By Admin | Updated: December 8, 2015 00:04 IST2015-12-07T23:18:43+5:302015-12-08T00:04:22+5:30
ढोकी : पोलीस ठाण्याचे गाव असलेल्या ढोकीसह परिसरात अवैध हातभट्टी, दारूविक्री, मटका, जुगार आदी अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून,

ढोकी परिसरात अवैध धंद्याला ऊत
ढोकी : पोलीस ठाण्याचे गाव असलेल्या ढोकीसह परिसरात अवैध हातभट्टी, दारूविक्री, मटका, जुगार आदी अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून, अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत़ दारूमुळे भांडण-तंट्यात वाढ झाली असून, पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध धंदे रोखण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे़
उस्मानाबाद तालुक्यातील राजकीयदृष्ट्या आणि बाजारपेठेच्या दृष्टीने ढोकी गावाची सर्वत्र ओळख आहे़ साधारणत: १५ हजार लोकसंख्येच्या गावातील तेरणा कारखान्यामुळे आर्थिक सुबत्ता आली़ कारखाना बंद पडला तरी इतर सुरू असलेल्या व्यवसायामुळे काही प्रमाणात आर्थिक उलाढाली सुरू आहेत़ दुष्काळी परिस्थितीत अनेकांना पोटाची खळगी भरणे मुश्किल होवून बसले आहे़ मात्र, येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे मात्र, अनेकांचे संसार उध्दवस्त होऊ लागले आहेत़ अवैध हातभट्टी, देशीदारूविक्री, मटका- जुगार आदी धंदेही जोमात सुरू आहेत़ दारूमुळे युवा पिढीही व्यसनाधीन होत असून, भांडण तंट्यातही वाढ झाली आहे़ अवैध धंद्यांना आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या ढोकी पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागानेकही अवैध दारूविक्रेत्यांकडे कानाडोळा होत आहे़
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसबे तडवळे, तावरजखेडा, पळसप, आरणी, कोंड, तेर या गावातही अवैध दारूविक्रीसह इतर अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे़ पोलीस प्रशासनाकडून काही गावात किरकोळ कारवाई करून दोन-चार बाटल्या किंवा ट्यूब पकडले जातात़ त्यानंतर काही तासातच कारवाई झालेला दारूविक्रेता पुन्हा गावात येवून दारूविक्री सुरू करीत असल्याचे सांगितले जात आहे़
महिलांच्या तक्रारीनंतर कारवाई
मागील काही महिन्यापूर्वी गोरेवाडी येथील महिलांनी अवैधरित्या किराणा दुकानात दारूविक्री केली जात असल्याची तक्रार ढोकी पोलिसांकडे केली होती़ महिलांनी तक्रार केल्यानंतरच पोलीस प्रशासनाने संबंधित दारूविक्रेत्यांवर कारवाई केली़ (वार्ताहर)