छत्रपती संभाजीनगर: शहर पाणी प्रश्नावर १३ एप्रिल पासून उद्धवसेनेचे लबाडांनो पाणी द्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १६ मे रोजी महापालिकेवर हल्लाबोल माेर्चा नेऊन करण्यात येणार आहे,अशी माहिती विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
आ. दानवे म्हणाले की, तीन महिन्यात शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देणारे भाजप, शिंदेसेना आता गप्प आहे. महापालिकेला ८३० कोटी रुपये कर्ज घेण्यास भाग पाडत आहे. मात्र मनपाची कर्ज फेडण्याची ऐपत नाही. जायकवाडी प्रकल्पात जॅकवेलचे काम केवळ १५ जण करीत आहेत. यावरुन किमान दिड वर्ष तरी जॅकवेलचे काम पूर्ण होणार नाही,असे दिसते. नवीन पाणी पुरवठा योजना हा विषय स्वतंत्र आहे. आम्ही शहराला उपलब्ध होणाऱ्या १४० एमएलडी पाण्याचे नियोजन नसल्याने शहरवासियांना १२ ते १३ दिवसाआड पाणी मिळते, याकडे मनपाचे लक्ष वेधले. आंदोलनानंतर आज शहरवासियांना ६ ते ७ दिवसाआड पाणी मिळत आहे. १३ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे शेकडो पदाधिकारी सहभागी झाले. शिवाय सामान्य जनतेनेही आमच्या आंदोलनात सहभाग नोंदविल्याचे आ. दानवे म्हणाले.१६ मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पैठणगेट येथून महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार असल्याचे दानवे यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे, अस्मिता गायकवाड, छाया शिंदे , सुनीता देव, सुकन्या भोसले ,बाळासाहेब थोरात,ज्ञानेश्वर डांगे यांची उपस्थिती होती.
११५ वॉर्डात हल्लाबोल पदयात्रा आणि बैठकाया आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात ९ ते १२मे दरम्यान पक्षाचे पदाधिकारी ११५ वॉर्डात हल्लाबोल पदयात्रा काढणार आहेत. शिवाय१० रोजी शहरातील ६० चौकात १० चित्ररथ लागतील. तेथे तीन मिनिटांचे रेकॉर्ड केलेले भाषणाची ऑडिओ सादर होईल. आणि रॅप साँग वाजविण्यात येईल. शिवाय ६० उपशहरप्रमुख तीन दिवसांत ५८० बैठका घेणार आहेत.