‘लाल्या’आला रे आला

By Admin | Updated: September 10, 2014 00:00 IST2014-09-09T23:39:13+5:302014-09-10T00:00:22+5:30

परभणी : डोक्यावर घागरीने पाणी आणून शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली़ परंतु त्यानंतर फूलकिडे, मर रोग यासह आता ‘लाल्या’ रोगाने कपाशीवर आक्रमण केले आहे़

'Laala'a ray got it | ‘लाल्या’आला रे आला

‘लाल्या’आला रे आला

परभणी : डोक्यावर घागरीने पाणी आणून शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली़ परंतु त्यानंतर फूलकिडे, मर रोग यासह आता ‘लाल्या’ रोगाने कपाशीवर आक्रमण केले आहे़ त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीकही हातचे जात असल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे़
मराठवाड्यातील नगदी पीक म्हणून कापसाला ओळखले जाते़ या पिकावरच शेतकऱ्याचे वर्षाचे आर्थिक नियोजन ठरविले जाते़ परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून कपाशीवर केलेला खर्चही शेतकऱ्यांना निघेनासा झाला आहे़ त्यातच कापसाला हमीभाव कमी मिळत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे़ एवढे कमी की काय यंदाच्या खरीप हंगामात निसर्गाने शेतकऱ्यांचा अंतच पाहिला़
जून, जुलैच्या अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती़ परंतु शेतजमिनीचा वापसा न झाल्यामुळे सोयाबीन व कापसाचे बियाणे जळून गेले़ त्यानंतर शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दुबार पेरणी केली खरी; परंतु पावसाने १५ ते २५ दिवस दांडी मारल्याने शेतकऱ्यांनी घागरीने पाणी आणून कापसाचे पीक जगविले़
कोरडवाहू शेतातील कापसाची पिके जळून गेली़ जी जिवंत राहिलेही कापूस पिकांची आजघडीला फुटभर वाढ झाली आहे़ या झाडाला आता फुलेही लागली आहेत़ शेतकऱ्यांनी एकरी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे़ त्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असल्याने जमिनीतील ओलावा हटत नसल्यामुळे आता कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़
यामुळे शेतकरी आता देशोधडीला लागला आहे़ जिल्ह्यातील लाखो हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे़ आता लाल्या रोगाचा प्रतिबंध कसा करावा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे़
गेल्या १० ते १२ दिवसांपूर्वीच कापूस पिकावर फुलकीड व मर या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता़ शेतकऱ्यांनी बाजारपेठेतून महागामोलाची औषधी आणून कापसावर फवारली़ त्यामुळे काही ठिकाणी कापसाचे पीक जोमात आले होते़ परंतु, आता या पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले आहे़ त्यामुळे हे पीक पुन्हा धोक्यात आले असून, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी झगडत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 'Laala'a ray got it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.