विकासकामांत वृक्षांवर कुऱ्हाड
By Admin | Updated: October 30, 2014 00:29 IST2014-10-30T00:04:34+5:302014-10-30T00:29:58+5:30
औरंगाबाद : शहराच्या विकासासाठी उड्डाणपूल, मोठमोठे रस्ते आवश्यक आहेत; परंतु या कामांमध्ये येणाऱ्या झाडांवर थेट कुऱ्हाडीचे घाव घालण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसून येते.

विकासकामांत वृक्षांवर कुऱ्हाड
औरंगाबाद : शहराच्या विकासासाठी उड्डाणपूल, मोठमोठे रस्ते आवश्यक आहेत; परंतु या कामांमध्ये येणाऱ्या झाडांवर थेट कुऱ्हाडीचे घाव घालण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसून येते. अशा कामांच्या प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त वृक्षतोड कशा पद्धतीने टाळता येईल, वेळप्रसंगी वृक्ष प्रत्यारोपण तंत्राचा वापर करण्याचा विचार अशा प्रकल्पांमध्ये आधीच करण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सिडको बसस्थानक चौकात उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान ग्रीन बेल्टमधील १४८ झाडे टप्प्याटप्प्याने तोडण्याचे नियोजन करण्यात आले. सर्व्हिस रोड करण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक झाडांवर कुऱ्हाडीचे घाव घालण्यातही आले. यानंतर आता औरंगाबाद- पैठण आणि औरंगाबाद- फर्दापूर चौपदरीकरणाच्या कामादरम्यान येणाऱ्या अनुक्रमे १,८०४ आणि ४,७८२ एवढ्या झाडांचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्ते, उड्डाणपूल यासारख्या प्रकल्पांना अनेक वर्षांच्या विचारानंतर मंजुरी मिळते. त्यामुळे अशा प्रकल्पांमध्ये वृक्षांचे अधिकाधिक संवर्धन होईल, याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. त्यासाठी झाडे जशीच्या तशी ठेवून कामे करण्याचा प्रयत्न; अथवा वृक्ष प्रत्यारोपण अशा पर्यायाचा विचार प्राधान्याने केला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.