तीन तलाठ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड
By Admin | Updated: July 14, 2016 01:36 IST2016-07-14T01:31:19+5:302016-07-14T01:36:46+5:30
संजय देशपांडे, औरंगाबाद गंगापूर तालुक्यातील सव्वाकोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान घोटाळ्याप्रकरणी तीन तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

तीन तलाठ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड
संजय देशपांडे, औरंगाबाद
गंगापूर तालुक्यातील सव्वाकोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान घोटाळ्याप्रकरणी तीन तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तलाठ्यांनी तयार केलेल्या बनावट लाभार्थ्यांच्या याद्यांवर सह्या करणाऱ्या तहसीलदारांवरही कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
शिरेसायगाव आणि गवळी शिवरा सजाचे तलाठी जे. के. सोनवणे, व्ही. व्ही. कंसार आणि ज्ञानेश्वर नजन यांच्यावर वैजापूरचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी निलंबनाची कारवाई केली, तर मंडळ अधिकारी के. के. जेठे, रिता पुरी आणि आर. डी. माने यांच्यावर कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा सहकारी बँकेने यापूर्वीच गंगापूरचे तालुका नियंत्रक व्ही. बी. जाधव, सिद्धनाथ वाडगावचे शाखाधिकारी एस. बी. खेडकर, रघुनाथनगरचे शाखाधिकारी आर. के. बारहाते, निरीक्षक बी. ई. कबाडी आणि अंबेलोहळ येथील लिपिक व्ही. बी. मोकळे यांना निलंबित केले होते. अशा प्रकारे जिल्हा बँक आणि तहसील कार्यालयातील निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता नऊ झाली आहे.
दुष्काळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या रूपाने मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षातील अनुदानासाठी गंगापूर तालुक्यास कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. शेतकऱ्यांना हेक्टरी ६,८०० रुपये किंवा जास्तीत जास्त १३,६०० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले.
वसुली करणार
गंगापूर तालुक्यात झालेल्या दुष्काळ अनुदान गैरव्यवहारप्रकरणी तीन तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंडळ अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चुकीच्या याद्यांवर सह्या करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी केली जाईल तसेच अनुदान हडपणाऱ्या बनावट शेतकऱ्यांकडून वसुली केली जाणार आहे.
- निधी पांडे, जिल्हाधिकारी