छत्रपती संभाजीनगर : केटरिंगच्या कामाचे २५ लाख ७० हजार रुपये मागितल्यानंतर फ्लॅटमध्ये बोलावून डांबून बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक कुणाल दिलीप बाकलीवाल (३८, रा. बीड बायपास) यास सातारा पोलिसांनी अटक केली आहे. त्यास रविवारी न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी दिली.
सातारा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार फिर्यादी अमित कासलीवाल यांचे कुणाल बाकलीवाल याच्याकडे केटरिंगच्या कामाचे २५ लाख ७० हजार रुपये थकले आहेत. हे पैसे मागितल्यानंतर कुणाल बाकलीवाल व सागर भानुशाली या दोघांनी बीड बायपासजवळील १८० ग्रीन सोसायटी या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये १२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ ते ६ वाजेदरम्यान पैसे देतो, असे म्हणून अमित यांना बोलावून घेतले. त्याठिकाणी अमित पोहोचल्यानंतर फ्लॅटमध्ये तीन तास कोंडून ठेवले, तसेच ड्रायव्हर व घरातील कामगाराच्या मदतीने दोघांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्या मारहाणीचे व्हिडीओ बनवून व्हायरल केले, तसेच दीड लाख रुपयांची सोन्याची चेनही हिसकावून घेतल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.८) चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर कुणाल बाकलीवाल यास अटक केली होती. आरोपीस न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
बाकलीवालच्या अडचणी वाढणारबाकलीवालचा क्रांती चौक पोलिसांकडे जमा असलेल्या मोबाइलमध्ये मारहाणीचा व्हिडीओ आहे का? यासह अन्य तपासासाठी तो मोबाइल सातारा पोलिस ताब्यात घेणार आहेत, तसेच त्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्यामुळे बाकलीवालच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्याने असे आणखी काही प्रकार केले आहेत का, याचादेखील पोलिस तपास करणार आहेत.