कुलकर्णी, अवचटच्या घरझडतीत मिळाली महत्त्वाची कागदपत्रे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 00:19 IST2016-01-03T23:42:27+5:302016-01-04T00:19:42+5:30
औरंगाबाद : अनिवासी भारतीयांचा फंड मिळवून देण्याच्या नावाखाली औरंगाबादेतील औषधी व्यावसायिकाला ३५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या

कुलकर्णी, अवचटच्या घरझडतीत मिळाली महत्त्वाची कागदपत्रे...!
औरंगाबाद : अनिवासी भारतीयांचा फंड मिळवून देण्याच्या नावाखाली औरंगाबादेतील औषधी व्यावसायिकाला ३५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या निवेदिता कुलकर्णी आणि विश्वनाथ अवचट यांच्या पुणे येथील वेगवेगळ्या घरांची रविवारी पोलिसांनी झडती घेतली. या झडतीत पोलिसांच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे, डायऱ्या आणि चेकबुक लागले आहेत. विशेष म्हणजे सरकारी पंचांना सोबत घेऊन ही झडती घेण्यात आली.
सिडकोतील अभिजित कुलकर्णी यांना अनिवासी भारतीयांचा फंड मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपी निवेदिता कुलकर्णी, विश्वनाथ अवचट, बाळासाहेब दैठणकर, कमलाकर कुलकर्णी, सुरेश चव्हाण आणि अशोक जंगम (रा.मुंबई) यांनी तब्बल ३५ लाख रुपयांचा गंडा घातला. अशाच प्रकारे या टोळीने राज्यातील अनेकांना सुमारे दोन कोटी रुपयांना फसवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी निवेदिता आणि विश्वनाथ यांना मुंबईतून अटक करून आणले. दरम्यान, रविवारी आरोपींच्या पुणे येथील घराची झडती घेण्यासाठी फौजदार सुभाष खंडागळे, पोलीस कर्मचारी दादासाहेब झारगड, सुरवाडे, कुलकर्णी, महिला पोलीस जयश्री फुके आणि दोन सरकारी पंच गेले. या पथकाने अवचटच्या सिंहगड रोडवरील फ्लॅटची आणि लक्ष्मीनगर येथील भावाकडे राहणाऱ्या निवेदिता यांच्या घराची झडती घेतली.
या झडतीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे बनावट बॉण्ड पेपर, दोन डायऱ्या, दोन चेकबुक मिळाले. या डायऱ्यांमध्ये आरबीआयच्या बॉण्ड पेपरवर हाताने लिहिलेला मजकूर मिळाला. तसेच हिशेबाची एक डायरीही पोलिसांच्या हाती लागली.