सेंद्रीय शेती करणारे जाधव यांना कृषीभूषण पुरस्कार
By Admin | Updated: August 9, 2014 00:26 IST2014-08-09T00:02:27+5:302014-08-09T00:26:33+5:30
सेंद्रीय शेती करणारे जाधव यांना कृषीभूषण पुरस्कार

सेंद्रीय शेती करणारे जाधव यांना कृषीभूषण पुरस्कार
जालना: अवघ्या तीन एकर जमिनीवरच सेंद्रीय शेतीतून पारंपरिक पिकांसह फळबागा व रोपवाटिका फुलवून लाखोंचे उत्पन्न साधणारे केदार मारोतराव जाधव या अल्पभूधारक शेतकऱ्याची राज्याच्या कृषी विभागाने दखल घेतली. सेंद्रीय शेतीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कृषीभूषण पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.
जालना तालुक्यातील निरखेडा येथील जाधव कुटुंबिय. केवळ १ हेक्टर २१ आर म्हणजे तीन एकर जमीन. परंतु या अल्पशा जमिनीतूनही चांगले उत्पादन पदरी पडावे म्हणून जाधव कुटुंबिय पुढे सरसावले. प्रचंड जिद्द, मेहनतीच्या जोरावरच या कुटुंबियांनी राबराब राबून मळा फुलविण्याचा संकल्प केला. काळी जमीन. तीही भुसभुसशीत. या सोन्यासारख्या जमिनीतून बऱ्यापैकी उत्पन्न पदरी पडत होते. मात्र, काळी जमीन भुरखी पडत असल्याची शंका जाधव यांच्या मनात चुकचुकली. त्याचवेळी बिडकीन येथील आयआयआरडी या संस्थेशी संपर्क साधला. तेंव्हा त्यांनी जाधव यांना सेंद्रीय शेतीचा मंत्र दिला.
रासायनिक खतामुळेच काळी जमीन भुरखी पडत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जाधव यांनी सेंद्रीय शेतीचा संकल्प केला. काडीकचऱ्यातून कंपोस्ट खत, दोन बैल व दोन गायींपासून शेणखत मिळवून त्यावरच पिके जोपासली. विशेष म्हणजे सेंद्रीय खते वापरताना सुद्धा पिकावरील कीड नियंत्रणाकरिता जीवांमृत, दशपर्णी आर्क, लिंबोळी आर्काचा वापर केला. त्या आधारावरच जाधव यांनी गेल्या सात वर्षांपासून अल्पशा जमिनीतून चांगले उत्पादन घ्यावयास सुरुवात केली. पहिल्या दोन वर्षांत समाधानकारक असले उत्पन्न पदरात पडले नाही. मात्र, निराश न होता जाधव यांनी पुढील वर्षांपासून जोरदार उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली. सद्यस्थितीत तीन एक जमिनीपैकी पावणे दोन एकर जमिनीवर मोसंबीची दीडशे झाडे आहेत. तीही सेंद्रीय शेतीवरच फुलवली आहे. वीस गुठ्यांत सुंदर अशी रोपवाटिका आहे. त्यातून अडीच ते तीन लाख रुपयांचे ते उत्पन्न मिळवित आहेत. सोयाबीन व अन्य पारंपरिक पिके घेत आहेत. गेल्यावर्षी चाळीस आर जमिनीवर सेंद्रीय पद्धतीने पपई जगवून, फुलवून जाधव यांनी सरासरा वीस टन उताऱ्याद्वारे पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न पदरी पाडून घेतले. या सेंद्रीय शेतीतून ते सरासरी दरवर्षी साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवित आले आहेत.
राज्यसरकारच्या कृषी विभागाने अल्पभूधारक असणाऱ्या जाधव यांच्या या यशोगाथेची दखल घेतली. गेल्यावर्षी वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार जाहीर करीत प्रदान केला. तत्पूर्वी जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या शेतीस भेट देऊन कौतुक केले. कृषी अधीक्षक उमेश घाटगे, कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड, वाघमारे, जिल्हा परिषद कृषी विभागाचे लडके यांच्यासह कृषी विभागतील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)