कोविड रुग्णांचे आता म्युकरमायकोसिसचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:05 IST2021-05-15T04:05:07+5:302021-05-15T04:05:07+5:30
सोयगाव : कोरोना संसर्गाच्या रुग्णांचा कोविड केंद्रातील कालावधी आता सात दिवसांवरून दहा दिवस करण्यात आल्याचा निर्णय शुक्रवारपासून जिल्हा आरोग्य ...

कोविड रुग्णांचे आता म्युकरमायकोसिसचे निरीक्षण
सोयगाव : कोरोना संसर्गाच्या रुग्णांचा कोविड केंद्रातील कालावधी आता सात दिवसांवरून दहा दिवस करण्यात आल्याचा निर्णय शुक्रवारपासून जिल्हा आरोग्य विभागाने घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या अंगावरील फंगल इन्फेक्शनच्या निरीक्षणासाठी आता कोविड केंद्रातच उपचार सुविधा निर्माण करण्यात आल्याने कोरोना रुग्णांवर आता सातऐवजी दहा दिवस उपचार करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी दिली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यावर पुन्हा म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झालेला आहे. सात दिवसानंतर बाधित रुग्ण घरी परतल्यावर काळजी घेत नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या निदर्शनास आल्यावरून आता या बाधित रुग्णांना सातऐवजी दहा दिवस कोविड केंद्रातच ठेवण्याचा निर्णय जिल्हा आरोग्य विभागाने घेतला आहे. कोरोनातून रुग्ण मुक्त झाल्यावर म्युकरमायकोसिस (बुरशी) आजार होत असल्याच्या केसीस राज्यात आढळल्या आहेत. त्यामुळे कोविड केंद्रातच वैद्यकीय तज्ज्ञांकडून निरीक्षण करण्यात येईल.
चौकट-
कोरोनामुक्त घरी गेलेल्या रुग्णांचेही सर्वेक्षण सुरू
सोयगाव तालुक्यातून कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांना काही त्रास आहे का किंवा त्यांना बुरशीजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे का, याबाबत तालुका आरोग्य विभागाच्या पथकांकडून सर्वेक्षण हाती घेण्यात आलेले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. जिल्हा आरोग्य विभागाकडून तातडीने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबत माहिती मागवण्यात आली आहे.
कोट
कोविड केंद्रातून सात दिवसानंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे आता पुन्हा तीन दिवस निरीक्षण केले जाणार आहे. रुग्ण घरी परतल्यावर काळजी घेत नाहीत. त्यामुळे नवीन व्हायरसचा हा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- डॉ. श्रीनिवास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी सोयगाव