छत्रपती संभाजीनगर : शहरात लुटमारीचे सत्र कायम राहत गेल्या चोवीस तासांत पुन्हा तिघांना लुटण्यात आले. शिवाजीनगरमध्ये वृद्धेची सोनसाखळी हिसकावून नेली तर पैसे देण्यास नकार दिला म्हणून इंदिरानगरमध्ये चार जणांनी शाळकरी मुलाच्या गळ्यावर चाकूने वार केले.
सुरेखा देशमुख (रा. शिवाजीनगर) या मंगळवारी सकाळी १०:३० वाजता परिसरातील दुकानात गेल्या होत्या. तेथून घराकडे पायी जात असताना कॉलवर बोलण्याचे नाटक करत एक तरुण त्यांचा पाठलाग करत होता. तो समोर जाईल, असे वाटल्याने देशमुख निर्धास्त राहिल्या. घराजवळ पोहोचल्यानंतर कंपाऊंडचे गेट उघडतानाच त्याच तरुणाने सोनसाखळी हिसकावली. देशमुख यांनी ती पकडून ठेवली; तरी चोराच्या हाती जवळपास ६ ग्रॅमची साखळी लागली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस तपास करीत आहेत.
महावितरणमध्ये कार्यरत सय्यद फिरदोस सय्यद रज्जाक (रा. रोजाबाग) हे २४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता मनपा मुख्यालय परिसरात गेले होते. तेथे कार उभी करून ते काही वेळासाठी बाहेर आले. पुन्हा कारजवळ जाताच त्यांच्या कारमधून ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनी मोबाइल लंपास केल्याचे लक्षात आले.
पैशांसाठी गळ्यावर चाकूने वारइंदिरानगरमध्ये राहणाऱ्या अर्चना दिवेकर यांचा मुलगा दीपेश हा २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता मित्र साहिल मनोहरसोबत दुकानावर जात होता. तेव्हा सुमित, मझहर व त्यांच्या दोन साथीदारांनी त्यांना अडवून पैशांची मागणी केली. दीपेशने पैसे देण्यास नकार देताच एकाने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केला. साहिललाही मारहाण केली. जवाहरनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.