किशनचंद तनवाणी यांचा भाजपासोबत घरोबा

By Admin | Updated: September 27, 2014 01:10 IST2014-09-27T01:05:14+5:302014-09-27T01:10:49+5:30

औरंगाबाद : किशनचंद तनवाणी हे भाजपाकडून औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

Kishanchand Tanwani with BJP | किशनचंद तनवाणी यांचा भाजपासोबत घरोबा

किशनचंद तनवाणी यांचा भाजपासोबत घरोबा

औरंगाबाद : शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार किशनचंद तनवाणी हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन भाजपाकडून औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. उद्या २७ रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्यामुळे मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. राजकारणात टिकून राहण्यासाठी त्यांनी औरंगाबाद मध्य मधून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली होती. पक्षाकडे तिकिटही मागितले होते. उमेदवारी मिळेल या आशेनेच त्यांनी पराभव समोर दिसत असतानाही आॅगस्ट २०१३ मध्ये झालेली विधान परिषद निवडणूक शिवसेनेकडून लढविली. मात्र, आ. प्रदीप जैस्वाल यांना आॅगस्ट २०१२ मध्ये पक्षाने उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यामुळे तनवाणी यांचा पत्ता कट झाला. निवडणूक लढविण्याच्या हेतूनेच तनवाणी यांनी भाजपासोबत घरोबा करून अनेक वर्षांची शिवसेनेची साथ सोडली.
सेनेकडून आ.जैस्वाल यांनी २५ रोजी ‘मध्य’मधून अर्ज भरताच तनवाणी यांची अस्वस्थता वाढली. काल पूर्ण दिवस ते ‘नॉट रिचेबल’ होते. महायुती तुटल्याचे समजताच काल सायंकाळी तनवाणी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. विनोद तावडे यांची भेट घेऊन मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना उमेदवारी देण्याबाबत शुक्रवारी निश्चित झाले. त्यांच्या भाजपा प्रवेशाचे होर्डिंग्जही गुलमंडीवर झळकले. शिवसेनेचे काही नगरसेवक, पदाधिकारी सोबत असल्यामुळे त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्याने सेनेत अस्वस्थता वाढली आहे. १९८८ पासून सेनेचे काम करीत असलेले तनवाणी यांना पक्षाने शहराध्यक्ष, नगरसेवक, सभागृह नेता, महापौर, आमदार ही पदे दिली. एवढी पदे मिळूनही सेनेशी फारकत घेतली. भाजपात प्रवेश का केला, याचे उत्तर देताना तनवाणी म्हणाले, हिंदुत्ववादी पक्ष आहे, त्यामुळेच प्रवेश केला आहे. निवडणूक लढविणे हादेखील उद्देश त्यामागे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपली काहीही नाराजी नाही. सेनेत असताना तनवाणी यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क वाढवला होता. पक्षाकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेवटी सेनेला सोडचिठ्ठी दिली.

Web Title: Kishanchand Tanwani with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.