पैशांसाठी वाळू व्यावसायिकाचे अपहरण अन् नाट्यमय सुटका

By Admin | Updated: November 5, 2014 01:00 IST2014-11-05T00:52:56+5:302014-11-05T01:00:05+5:30

औरंगाबाद : पैशांसाठी एका टोळीने वाळू व्यावसायिकाचे मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमधून अपहरण केले. नंतर पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच

Kidnapping of sand merchant for money and dramatic release | पैशांसाठी वाळू व्यावसायिकाचे अपहरण अन् नाट्यमय सुटका

पैशांसाठी वाळू व्यावसायिकाचे अपहरण अन् नाट्यमय सुटका


औरंगाबाद : पैशांसाठी एका टोळीने वाळू व्यावसायिकाचे मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमधून अपहरण केले. नंतर पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी या वाळू व्यावसायिकाची मिटमिट्याजवळ सुटका केली. हे अपहरण नाट्य मंगळवारी घडले.
अपहरणकर्त्यांच्या टोळीतील गणेश ऊर्फ पप्पू अशोक इंगळे (रा. दलालवाडी) व फिरोज मोहंमद तांबोळी (रा. मिल कॉर्नर) या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील राजू भुतेकर, रिडलॉन व चावरिया हे तीन आरोपी फरार झाले आहेत.
गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, काचीवाड्यातील संदीप प्रकाश हिवराळे (२८) या वाळू व्यावसायिकाचा पैशांच्या देवाणघेवाणीवरून आरोपी राजू भुतेकरसोबत वाद सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी संदीप हा त्याच्या मैत्रिणीसोबत मध्यवर्ती बसस्थानकाजवळील हॉटेल रविराजमध्ये गप्पा मारत बसलेला होता. साडेअकरा वाजेच्या सुमारास आरोपी भुतेकर हा पप्पू इंगळे, फिरोज तांबोळी, रिडलॉन, चावरिया याच्यासह हॉटेलमध्ये पोहोचला. आरोपी इंगळे व इतरांनी ‘चल भुतेकरचे ७० हजार रुपये त्याला आताच दे अन् हे प्रकरण मिटविण्यासाठी आम्हालाही पैसे दे,’ असे म्हणत संदीपला धमकाविले.
इकडे संदीपच्या वडिलांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधून आपल्या मुलाचे काही जणांनी अपहरण केले असून, त्याला ते मिटमिट्याकडे घेऊन गेले आहेत, अशी माहिती कळविली. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, फौजदार गिरीधर ठाकूर, सुभाष खंडागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिटमिट्याच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांच्या गाड्या रस्त्यावर दिसताच आरोपींचे धाबे दणाणले. मिटमिट्याजवळच आरोपींनी संदीपला धमकावत कारमधून खाली ढकलून दिले.
आरोपींचे असेही धाडस
आरोपींच्या तावडीतून सुटका होताच संदीपने वडिलांशी संपर्क साधला. तेव्हा त्याचे वडील पोलीस आयुक्तालयात बसलेले होते. त्यांनी त्याला थेट आयुक्तालयात येण्यास सांगितले. रिक्षा पकडून तो पोलीस आयुक्तालयासमोर आला. विशेष म्हणजे आरोपी पप्पू इंगळे व फिरोज तांबोळी हे दोघे एका दुचाकीवर त्याचा पाठलाग करीत आले आणि त्यांनी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारातून पुन्हा संदीपचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला; परंतु संदीपने आरडाओरड केल्याने तेथे असलेले गुन्हे शाखेचे पोलीस धावत आले आणि त्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

Web Title: Kidnapping of sand merchant for money and dramatic release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.