प्रेमात सैराट... फसवणूक... पश्चात्ताप अन् नंतर सुटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:30 IST2017-07-28T00:30:27+5:302017-07-28T00:30:27+5:30
जालना : पुण्याला नातेवाईकांकडे शिक्षणासाठी गेलेल्या जालन्याच्या युवतीला एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तरुणीने सैराट होत त्याच्यासोबत संसार सुरू केला; परंतु काही दिवसांतच खोलीत बंदिस्त करून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला

प्रेमात सैराट... फसवणूक... पश्चात्ताप अन् नंतर सुटका !
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पुण्याला नातेवाईकांकडे शिक्षणासाठी गेलेल्या जालन्याच्या युवतीला एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तरुणीने सैराट होत त्याच्यासोबत संसार सुरू केला; परंतु काही दिवसांतच खोलीत बंदिस्त करून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने कसाबसा नातेवाईकांशी संपर्क केला. नातेवाईकांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची भेट घेतली. खोतकरांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला अन् पुणे पोलिसांनी सदर युवतीची सुटका केली.
कोमल (२१ नाव बदलले) पुणे येथे नातेवाइकांकडे शिक्षण घेत खासगी नोकरी करायची. अशोक (२० नाव बदलले) याने कोमलला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अशोकचे वय कमी असल्यामुळे त्यांनी लग्न न करता एकत्र राहण्याचे ठरवले. आई-वडील व नातेवाईकांचा विरोध डावलून कोमल पुण्यात अशोकच्या घरी राहू लागली. गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या अशोकच्या नातेवाईकांनी कोमलच्या नातेवाईकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याने त्यांचा नाईलाज झाला. काही दिवस सुरळीत गेल्यानंतर अशोकच्या नातेवाइकांनी कोमलचा छळ सुरू केला. अशोकनेही कोमलकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. फोन हिसकावून घेत तिला एका खोलीत बंदिस्त करण्यात आले. अशोकची आई, दीर, जावा कोमलला सतत मारहाण करायचे. त्यांच्याप्रमाणे राहण्यास सांगायचे.
‘जगण्याने छळले होते, आता मरणानेच होईल सुटका’, असे कोमलला वाटू लागले. नातेवाइकांशी तिचा संपर्क होऊ दिला जात नसे. कोमलने एके दिवशी रात्रीच्या वेळी खोलीत झोपलेल्या सासूच्या फोनवरून जालन्यातील नातेवाईकांना चोरून फोन केला. सर्व हकीकत सांगितली.
काही दिवसानंतर पुन्हा फोन करून आपला प्रचंड छळ सुरू असून, एक दिवस हे लोक मला मारून टाकतील, माझी सुटका करा, अशी आर्त विनवणी केली. मात्र, भीतीपोटी तिच्या नातेवाइकांचे अशोकच्या घरी जाण्याचे धाडस झाले नाही. त्यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. खोतकरांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क केला.
कोमलच्या नातेवाईकांना पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी पुण्याला पाठविले. सर्व प्रकार समजल्यानंतर पुणे पोलिसांच्या एका पथकाने कायदेशीर कारवाई करून कोमलची अशोकच्या घरातून सुटका करीत तिला नातेवाईकांच्या स्वाधीन केले. कोमलच्या नातेवाईकांना सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, कृष्णा तंगे यांचेही सहकार्य मिळाले.