कामगाराचे अपहरण करून डांबले; मिठाई दुकानदारावर गुन्हा
By | Updated: November 27, 2020 04:00 IST2020-11-27T04:00:04+5:302020-11-27T04:00:04+5:30
दुंगलसिंग, पदमसिंग, राजूसिंग, राजकमल आणि दोन अनोळखी आरोपींचा यात समावेश आहे. वेदांतनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मगराज मांगीलाल ...

कामगाराचे अपहरण करून डांबले; मिठाई दुकानदारावर गुन्हा
दुंगलसिंग, पदमसिंग, राजूसिंग, राजकमल आणि दोन अनोळखी आरोपींचा यात समावेश आहे. वेदांतनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मगराज मांगीलाल नाई (मूळ रा. जोधपूर, राजस्थान) हे मागील अनेक वर्षांपासून रेल्वे स्टेशन रोडवरील मधुर मिलन मिठाई भंडार येथे कचोरी, समोसा बनविण्याचे काम करीत होते. त्यांना २४ हजार रुपये महिना वेतन ठरविण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही तेथे कामाला होता. ठरल्यानुसार दुकान मालक वेतन देत नव्हते. तीन वर्षांपासून पगाराचे पैसे दिले नाहीत, तसेच पैशाची मागणी केल्यानंतर शिवीगाळ करून मारहाण करीत असत. यामुळे तक्रारदार आणि त्यांचा मुलगा काम सोडून निघून गेले. तक्रारदार हे नांदगाव येथे एका मिठाई दुकानावर काम करीत असल्याची माहिती आरोपींना मिळाली. यानंतर १९ नोव्हेंबर रोजी दुपारी आरोपींनी मगराज यांचे नांदगाव येथून अपहरण करून औरंगाबादला आणले. रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरातील दुकानाच्या कारखान्यात त्यांना डांबण्यात आले. आमचे काम कर अन्यथा जिवे मारू, अशी धमकी देऊन त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांनी कशीबशी सुटका करून घेतली. मंगळवारी त्यांनी वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध तक्रार नोंदविली, त्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. या घटनेची सुरुवात नांदगाव येथून झाल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वेदांतनगर पोलिसांनी दिली.
===चौकट
नजर चुकवून काढला पळ
पाळत ठेवणाऱ्या लोकांची मंगळवारी (दि.२४) सायंकाळी नजर चुकवून मगराज यांनी पळ काढला आणि थेट वेदांतनगर ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांना त्यांनी घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.