खुलताबाद शहराचा पाणीप्रश्न पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:30+5:302021-07-07T04:06:30+5:30
खुलताबाद शहराचा पाणीप्रश्न पेटला , निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापले : नागरिकांच्या नशिबी मात्र दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी खुलताबाद : खुलताबाद ...

खुलताबाद शहराचा पाणीप्रश्न पेटला
खुलताबाद शहराचा पाणीप्रश्न पेटला ,
निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापले : नागरिकांच्या नशिबी मात्र दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी
खुलताबाद : खुलताबाद नगर परिषद गेल्या वर्षभरापासून नागरिकांना दूषित व पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा करत आहे. दूषित पाण्यामुळे नगर परिषद प्रशासनाला अनेक वेळा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले; पंरतु नगर परिषदेने योग्य ती काळजी व उपाययोजना केला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहराच्या दूषित पाण्यावरून नागरिकांनी निवेदन, मोर्चे, आंदोलन झाल्यानंतर हा प्रश्न थेट न्यायालयात गेल्याने खुलताबाद शहराचा पाणीप्रश्न पेटला आहे.
खुलताबाद आणि पाणीटंचाई हे समीकरण जुनेच आहे. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जाण्याची सवय येथील नागरिकांना लागली आहे. गेल्या वर्षी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारा गिरिजा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. खुलताबादकरांना मुबलक पाणी मिळेल, अशी आशा होती; परंतु तसे काही झालेच नाही. कारण पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन जवळपास चाळीस वर्षे जुनी असल्याने ती जीर्ण झाल्याने वारंवार जागोजागी फुटते.
नगर परिषदेकडे पाणी साठविण्यासाठी मोठा जलकुंभ नसल्याने शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी तीन झोन करून रोटेशन पद्धतीने तीन दिवसांआड पाणी पुरवठा आजही पावसाळ्यात करण्यात येत आहे. त्यातच शहरात होणारा पाणी पुरवठा हा दूषित व पिवळ्या रंगाचा होत असल्याने नागरिकांनी दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नगर परिषदेत केल्या; परंतु खुलताबाद नगर परिषदेत याबाबत लोकप्रतिनिधींनी याबाबत योग्य ती दखल घेतली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
----
आजही दूषित पाणी पाणी पुरवठा
शहरात होणारा पाणी पुरवठा हा पिवळ्या रंगाचा व दूषित असून पाणी भरल्यानंतर पाण्यात दुसऱ्या - तिसऱ्या दिवशी बारीक किडे तयार होत आहेत. प्रयोगशाळेत आम्ही पाण्याची तपासणी केली असता सदरील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे, तरीही नगर परिषद प्रशासन योग्य ती खबरदारी घेत नसल्यामुळेच आम्हास जनतेच्या आरोग्यासाठी हे पाऊल उचलावे लागले. - अब्दुल मजीद मणियार, याचिकाकर्ते.
---
१८ कोटींचा प्रस्ताव दिला
खुलताबाद शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी १८ कोटी रुपयांवी पाणी पुरवठा योजना मंजूर व्हावी म्हणून राज्य शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी मिळाला तर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेल. या योजनेत गिरिजा मध्यम प्रकल्प ते खुलताबाद पाइपलाइन टाकणे. शहरांतर्गत पाइपलाइन टाकणे, पाच लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आदी कामांचा समावेश आहे.
- ॲड. एस. एम. कमर, नगराध्यक्ष
---
निवडणूक डोळ्यांसमोर राजकारण
खुलताबाद नगर परिषदेच्या दूषित पाणी पुरवठ्यासंदर्भात जनहित याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते अब्दुल मणियार हे एमआयएम पक्षाचे खुलताबाद शहर प्रभारी आहेत. आगामी (पाच महिन्यांनंतर) नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ते राजकारण करू पाहत आहेत. खुलताबाद नगर परिषदेला बदनाम करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप पाणी पुरवठा सभापती योगेश पा. बारगळ यांनी केला आहे.
----
सोबत फोटो: खुलताबाद नगर परिषद इमारत.