राज्यस्तरीय पथकाकडून ‘खिचडी’ची तपासणी
By Admin | Updated: December 4, 2014 00:53 IST2014-12-04T00:51:10+5:302014-12-04T00:53:15+5:30
उस्मानाबाद : खिचडीत लेंढ्या निघाल्या...तांदळामध्ये अळ्या...पालेभाज्यांचा वापर नाही...अशा नानाविध तक्रारी ग्रामस्थांतून होत होत्या.

राज्यस्तरीय पथकाकडून ‘खिचडी’ची तपासणी
उस्मानाबाद : खिचडीत लेंढ्या निघाल्या...तांदळामध्ये अळ्या...पालेभाज्यांचा वापर नाही...अशा नानाविध तक्रारी ग्रामस्थांतून होत होत्या. शासनाचे पोषण आहारावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही शाळकरी विद्यार्थ्यांना बेचव खिचडी खावी लागत असल्याची ओरडही होत होती. याच पार्श्वभूमीवर ‘खिचडी’ची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय पथक दोन दिवसांपासून जिल्ह्यात शाळांवर जावून चौकशी करीत आहेत. त्यामुळे आता ‘बेचव’ खिचडीची पोलखोल होण्याच्या शक्यतेने पोषण आहाराच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, पर्यायाने विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागावा, यासाठी शासनाच्या वतीने पोषण आहार ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना खिचडी पुरविली जाते. सुरूवातीचे काही दिवस ही योजना उत्तम पद्धतीने सुरू होती. परंतु, कालांतराने विशेषत: पोषण आहाराच्या दर्जाबाबात तक्रारी वाढू लागल्या. तसेच पोषण आहार शिजविताणा स्वच्छता पाळली जात नसल्याबाबतही ओरड होत होती. अनेकवेळा शिजविलेल्या खिचडीमध्ये लेंढ्या निघाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खिचडीमध्ये निश्चित केलेल्या मेनुप्रमाणे पालेभाज्या वापरल्या जात नसल्याची ओरडही पालकांतून सातत्याने होते.
दरम्यान, पोषण आहाराबाबत सातत्याने पालकांतून होत असलेली ओरड लक्षात घेवून शासनाने सदरील पोषण आहाराची (खिचडी) चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय पथक मंगळवारी दाखल झाले आहे. या पथकाचे प्रमुख शिक्षक संचालक आहेत.
पथकामध्ये राज्यस्तरावरील चार आणि जिल्ह्यातील चार सदस्यांचा समावेश आहे. दोन दिवसांमध्ये भूम, परंडा, लोहारा, उमरगा आणि तुळजापूर या तालुक्यांतील जवळपास प्रत्येकी तीन याप्रमाणे शाळांची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी खिचडीची गुणवत्ता, स्वच्छता यासोबतच विद्यार्थ्यांची गुणवत्ताही तपासली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पथकाच्या अचानक तपासणीमुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)