सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी
By Admin | Updated: June 5, 2017 00:27 IST2017-06-05T00:26:33+5:302017-06-05T00:27:17+5:30
जालना : जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे

सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांचे प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी ‘उन्नत कृषी समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत कृषी विभागाने विशेष नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके वेळेत व योग्य दराने उपलब्ध व्हावी, बियाण्यांचा काळाबाजार रोखला जावा यासाठी नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.सध्या शेतात नांगरणी, वखरणीसह मशागतीची अन्य कामे सुरू आहेत.
मागील वर्षी जिल्ह्यात सहा लाख २६ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती, हे क्षेत्र यंदा २६ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. यंदा खरिपाच्या एकूण क्षेत्रामध्ये एक लाख ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन, ८३ हजार हेक्टरवर मका, २९ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी अपेक्षित आहे.
एक लाख ६३ हजार हेक्टरवर तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे. तर मागील वर्षी दोन लाख ३४ हजार हेक्टरवर असणारे कापसाचे क्षेत्र यंदा २० टक्याने घटण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामात हेक्टरी पीक उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने वेगवेळ्या पातळ्यांवर नियोजन केले आहे. जिल्हास्तरावर बियाणे सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून कापूस, सोयाबीन व कडधान्य बियाण्यांच्या वितरणावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध, अप्रमाणित बियाण्यांची व्रिकी होऊ नये याकरिता निरीक्षकांमार्फत बियाण्यांचे नुमने काढण्यात आले आहेत. बि-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके याचा काळबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यास एक तर जिल्हास्तरावर एक, अशा नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कृषी विभागाने उपाययोजना केल्या असून, त्याची अमलबजावणी केली जात आहे.