खरिपाचा पेरा वाढणार
By Admin | Updated: June 8, 2017 00:30 IST2017-06-08T00:25:42+5:302017-06-08T00:30:16+5:30
नांदेड: जिल्ह्यात यंदा खरिपाचा पेरा वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे़

खरिपाचा पेरा वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्ह्यात यंदा खरिपाचा पेरा वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे़ त्यात रोहिण्या चांगल्या बरसल्याने शेतकरी आनंदीत झाला असून खरिपाच्या पेरणीची अंतिम लगबग सुरू असून आता बी-बियाणे खरेदीची तयारी केली जात आहे़
जिल्ह्याचे १० लाख ३३ हजार १०० हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे़ त्यातील ७ लाख ७३ हजार ८०० हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली येते़ त्यामध्ये खरीपाच्या ७ लाख ५४ हजार ६६१ तर रबीच्या १ लाख ३६ हजार हेक्टरचा समावेश आहे़ जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके आहेत़ सर्वाधिक पेरा हा खरीप हंगामात होतो़ गतवर्षी ७ लाख ६९ हजार २५० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांचा पेरा झाला होता़ यात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा अपेक्षित आहे़ जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, २ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रात कापूस, ७८ हजार हेक्टर क्षेत्रात तूर तसेच ७६ हजार ५७५ हेक्टर क्षेत्रात इतर पिकांची लागवड होणे अपेक्षित आहे़
कापसासाठी १३ लाख २५ हजार बीटी कापूस बियाणांच्या पाकिटांची गरज भासणार आहे़ तर नॉन बीटी बियाणांचे २५ हजार पाकिटे आवश्यक आहेत़ जिल्ह्यात खरीप पिकासाठी इतर कंपन्यांच्या बियाणांचीही उपलब्धता होणार आहे़ त्याची संख्या ही १३ लाख १५ हजार इतकी आहे़ अजित वाणाचे २ लाख ५० हजार, राशीचे २ लाख ५० हजार, न्यूजिविडूचे १ लाख ५० हजार, कावेरीचे १ लाख ५० हजार, अंकूरचे एक लाख तसेच इतर कंपन्यांचे १ लाख ६५ हजार बियाणांची पाकिटे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहणार आहेत़ अन्य पिकांसाठी महाबीजनेही बियाणे उपलब्ध करून दिले आहेत़ ज्वारी, तूर, मूग, उडीद व सोयाबीन या प्रमुख पिकांसाठी महाबीजचे ५५ हजार क्विंटल तर खाजगी बियाणांचे प्रमाण हे ४४ हजार ५० क्विंटल इतके राहणार आहे़ खतासाठीही कृषी विभागाने नियोजन केले असून मागणीपेक्षा जास्त खते उपलब्ध होणार आहेत़ रबी पिकासाठी मागवलेले ७८ हजार ५०० क्विंटल खते शिल्लक आहेत़ तर २०१७ साठीही २ लाख ८५ हजार ७०० मेट्रिक टन खत उपलब्ध होणार आहे़