खरीप हंगामात केवळ तुरीवरच शेतकऱ्यांची मदार
By Admin | Updated: November 9, 2016 01:23 IST2016-11-09T01:25:42+5:302016-11-09T01:23:30+5:30
बीड उशिरा झालेल्या पावसाचा केवळ तुरीला फायदा झाला असून, या पिकाच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

खरीप हंगामात केवळ तुरीवरच शेतकऱ्यांची मदार
राजेश खराडे बीड
हंगामाच्या सुरवातीला अत्यल्प पाऊस, कीड, रोगराई व पिके अंतिम टप्प्यात असताना बसलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात सोयाबीन, बाजरी या पिकांसह कडधान्याचे मोठे नुकसान झाले होते. उशिरा झालेल्या पावसाचा केवळ तुरीला फायदा झाला असून, या पिकाच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
दरवर्षी खरिपातील सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांनीच शेतकऱ्यांना तारले आहे. यंदा मात्र निसर्गाच्या अवकृपेने खरीप हंगामाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. रिमझिम पावसाच्या आधारावर काही प्रमाणात उडीद, मूग शेतकऱ्यांच्या पदरी पडले खरे; मात्र उत्पादनात मोठी घट झाली होती. सोयाबीन, बाजरीची तर मोडणी करून रबी हंगामाला क्षेत्र रिकामे करण्यात आले होते. बागायती क्षेत्राप्रमाणे तुरीला अतिवृष्टीचा फायदा झाला होता. त्यामुळे सध्या तूर बहरली असून फुलोऱ्यात आहे. असे असताना देखील शेंग पोखरणारी व शेंगमाशीचा प्रादुर्भाव तुरीवर जाणवू लागला आहे.
या दोन्हीतून पिकांचा बचाव झाल्यास तुरीच्या उत्पादनात तिप्पट वाढ होणार असल्याचे कृषी अधिकारी रामेश्वर चांडक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शिवाय लागवडीपूर्वी केलेलीे मशागत व संरक्षण उपाययोजना याचा फायदाही उत्पादनाच्या रूपातून शेतकऱ्यांना होणार आहे.
सद्य:स्थितीला कापूस आणि तूर ही दोनच पिके वावरात असून, गुलाबी बोंडअळीचा धोका कापसाला वाढला आहे. यामध्ये कापसाचे बोंड दिसते खरे; मात्र या अळ्या बोंडातील कापूस उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे कापसाचे उत्पादन निम्म्यावर येत आहे. उर्वरित काळात शेतकऱ्यांनी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या पद्धतीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. याकरिता कृषी अधिकाऱ्यांचीही भूमिका महत्वाची आहे. दरम्यान, यंदा दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात खरिपात अपेक्षित उत्पादन पदरात पडले नाही.