खरीप हंगाम आला धोक्यात
By Admin | Updated: August 14, 2014 02:08 IST2014-08-14T02:03:13+5:302014-08-14T02:08:20+5:30
सेलू : वरूणराजाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात सापडली असून मुगाचे शंभर टक्के नुकसान झाल्यात जमा आहे़

खरीप हंगाम आला धोक्यात
सेलू : वरूणराजाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात सापडली असून मुगाचे शंभर टक्के नुकसान झाल्यात जमा आहे़ तर पावसाअभावी इतर पिकेही सुकू लागली आहेत़
पावसाळयाचे दोन महिने संपले तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही़ अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली़; परंतु, पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्यामुळे कापूस, तुर, सोयाबीन ही पिके धोक्यात आली आहेत. तर कडक उन्हामुळे खरीपाची पिके सुकू लागली आहेत़
सेलू तालुक्यात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे़ जवळपास तीस हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे़ बारा हजार हे़वर सोयाबीन, तुर ६ हजार ५०० हे़ व मुगाचे ८ हजार ५०० हे़ क्षेत्र आहे़ आजपर्यंत केवळ १५० मि़मी़ पाऊस झाला आहे़ जून महिन्यात झालेल्या अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केल्याने वाढ खुंटली आहे़ तर मूग, उडीद या पिकांवर पाऊस नसल्यामुळे सर्वाधिक परिणाम झाला आहे़ कापूस वाढीच्या अवस्थेत असतांना पाऊस नसल्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे़ त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे़
श्रावण महिन्यात येणाऱ्या सणावर तसेच गणेशोत्सव, महालक्ष्मी, पोळा हे सण साजरे करण्यासाठी मुग विकून आर्थिक घडी बसविण्याचा शेतकरी प्रयत्न करतात़ परंतू पावसाअभावी मुगाचे पीक गेल्यामुळे या सणांवर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे़ वळवाचा पाऊस झाला नाही़ त्यामुळे जमिनीचे तापमान वाढल्याने कापसांच्या पिकांवर परिणाम झाला आहे़ दरम्यान, शेतात पिके सुकत असल्यामुळे शिवार उजाड झाले आहे़ पावसाळयाचे दिवस असतांनाही नदी, नाले कोरडेठाक असल्यामुळे पाणीपातळी खालावत चालल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे़ (प्रतिनिधी)