कदमांच्या कार्यक्रमात खैरे यांची गैरहजेरी
By Admin | Updated: February 14, 2015 00:12 IST2015-02-13T23:59:20+5:302015-02-14T00:12:17+5:30
औरंगाबाद : देवळाई चौक ते देवळाईपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पार पडले.

कदमांच्या कार्यक्रमात खैरे यांची गैरहजेरी
औरंगाबाद : देवळाई चौक ते देवळाईपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. चंद्रकांत खैरे राहणार होते. परंतु ते अनुपस्थित होते. गेल्या दोन ते तीन कार्यक्रमांत रामदास कदम यांच्याकडून झालेल्या शाब्दिक हल्ल्यामुळे खा. खैरे यांनी या कार्यक्रमास गैरहजर राहण्यास प्राधान्य दिले, अशीच चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.
देवळाई चौकात आयोजित भूमिपूजनाच्या कार्यक्रमास आ. संजय शिरसाट, शिवसेनेचे संपर्क नेते विनोद घोसाळकर, आ. हर्षवर्धन जाधव, अंबादास दानवे, जि. प. सदस्या योगिता रमेश बाहुले, अनिता राजेंद्र राठोड, रेणुकादास वैद्य, नंदकुमार घोडेले आदी उपस्थित होते.
‘एमआयएम’ला उत्तर देणार
मनपा निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा समोर येईन, तेव्हा माझे विचार मांडेन आणि ‘एमआयएम’ला चोख उत्तर देणार असे रामदास कदम म्हणाले.
आधीचे पालकमंत्री साताऱ्यात एकदाही आले नसून आपण पहिले पालकमंत्री असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आपण दाऊदच्या मतदारसंघातून निवडून आल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
२०-२० लाखांना हार
कार्यक्रमादरम्यान परिसरातील रस्त्यांसाठी १ कोटी रुपये जाहीर करून टाका, असे कदमांना सांगण्यात आले. ते म्हणाले की, त्यानंतर कळाले की इतक्या मोठमोठ्या फुलांच्या माळा का टाकल्या? आधी खुश करायचे आणि हळूच पैसे मागायचे. म्हणजे २०-२० लाखांना एक हार पडत असल्याचे दिसते.
शिवाय १ कोटीच द्या म्हणतात. मी २ कोटी दिले तर काय अडचण येणार आहे, असेही ते म्हणाले.
मी मुंबईत बैठकीला
खा. खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘बीएसएनएल’च्या संदर्भात खासदारांची मुंबईत बैठक होती. म्हणून मी मुंबईला गेलो होतो. बैठकीला ‘बीएसएनएल’चे १५० अधिकारी उपस्थित होते.