खैरेंनी निवडले ‘आडगाव भोसले’, धूत यांनी वेरूळ
By Admin | Updated: November 2, 2014 00:22 IST2014-11-02T00:10:38+5:302014-11-02T00:22:51+5:30
औरंगाबाद : ‘संसद आदर्श ग्राम योजना’मध्ये चंद्रकांत खैरे यांनी आडगाव भोसले आणि राजकुमार धूत यांनी वेरूळला पसंती दिली आहे.

खैरेंनी निवडले ‘आडगाव भोसले’, धूत यांनी वेरूळ
औरंगाबाद : प्रत्येक खासदारांनी किमान एक गाव दत्तक घेऊन त्याचा सर्वांगीण विकास करण्याची संकल्पना असलेल्या ‘संसद आदर्श ग्राम योजना’मध्ये औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आडगाव भोसले (ता. कन्नड) आणि राज्यसभेचे सदस्य खासदार राजकुमार धूत यांनी वेरूळला पसंती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेच्या लोकसंख्येच्या निकषात दोन्ही गावे बसत नाहीत, त्यामुळे ही गावे बदलावीत, की खासदाराच्या आग्रहानुसार कायम ठेवावीत, यावर पुढील तीन-चार दिवसांत प्रशासन निर्णय घेणार
आहे.
केंद्र सरकारच्या सचिवांनी गुरुवारी यासंदर्भात व्हीसी घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना या योजनेसंदर्भात त्वरित पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खा. खैरे यांनी आडगाव भोसले या गावाला, तर खा. धूत यांनी वेरूळला मॉडेल रूप देण्याचे ठरविले आहे.
संबंधित लोकप्रतिनिधींनी या गावांची नावे प्रशासनाला सुचविली आहेत. आडगाव भोसले हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते, तर वेरूळ हे जागतिक पर्यटन स्थळ आहे. आडगाव भोसले या गावाची लोकसंख्या तीन हजारांहून कमी, तर वेरूळची लोकसंख्या ७ हजारांहून अधिक आहे.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, केंद्रीय स्तरावरून मिळालेल्या सूचनेनुसार खासदारांना ही गावे २०१६ पर्यंत मॉडेल करावी लागणार आहेत. त्यानंतर पुढील दोन वर्षांसाठी आणखी एका गावाची निवड त्यांनी करायची आहे.
पुढील तीन-चार दिवसांत ही गावे निश्चित केली जाणार आहेत. योजनेच्या निकषात बसणारी १२७ गावे (ग्रामपंचायत) जिल्ह्यात
आहेत.