‘मोदी लाटे’त निवडून आलेल्या खैरेंचा लोकसभेत पुन्हा प्रवेश अशक्य - आमदार सतीश चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 16:14 IST2017-10-15T16:09:25+5:302017-10-15T16:14:19+5:30
२०१४ साली ‘मोदी लाटे’त चंद्रकांत खैरे यांना जनतेने निवडूण दिले. आगामी लोकसभा निवडणूकीत मोदी लाट असणार नाही. तेव्हा खा. खैरे यांच्या विरोधातील नाराजीमुळे त्यांची लोकसभेत पुन्हा एंट्री होण्याची शक्यता धुसर असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.

‘मोदी लाटे’त निवडून आलेल्या खैरेंचा लोकसभेत पुन्हा प्रवेश अशक्य - आमदार सतीश चव्हाण
औरंगाबाद,दि. १५ : २०१४ साली ‘मोदी लाटे’त चंद्रकांत खैरे यांना जनतेने निवडूण दिले. आगामी लोकसभा निवडणूकीत मोदी लाट असणार नाही. तेव्हा खा. खैरे यांच्या विरोधातील नाराजीमुळे त्यांची लोकसभेत पुन्हा एंट्री होण्याची शक्यता धुसर असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला. सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यास अन् पक्षाने आदेश दिला तर खासदारकी लढविण्याचे संकेतही चव्हाण यांनी दिले.
आ. चव्हाण यांच्यातर्फे दिवाळी पाडव्यानिमित्त ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज्यात आगामी निवडणूकीत सत्तांतर होणार असल्याचा दावा केला. निवडणूकांनी आणखी दिड वर्ष बाकी आहे. तेव्हा त्याविषयी आताच भाकित वर्तविणे कठिण आहे. मात्र २०१४ प्रमाणे पुढील निवडणूकीत मोदी लाट असणार नाही. केंद्रात भाजपाच मोठा पक्ष ठरेल. मात्र आतासारखी परिस्थिती असणार नाही.
विधानसभा व लोकसभा निवडणूका एकत्रच होणार आहेत. खा. खैरे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार दिल्यास त्यांना पुन्हा निवडून येणे शक्य होणार नाही. खैरे यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे खैरेंना पुन्हा लोकसभेत इंट्री करणे कठिण होईल. यातच सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूकीला सामोरे गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश दिल्यास सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. निवडणूक लढविण्यापूर्वी लोकांचा कल पाहणार असल्याचे स्पष्ट संकेत आ. चव्हाण यांनी दिले.
विभागीय आयुक्त भापकर भाजपचे उमेदवार होणार?
यावेळी आ. चव्हाण यांना विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर लोकसभा निवडणूकीपूर्वी सेवानिवृत्त होत आहेत. ते भाजपाकडून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होत असल्याचे विचारले. त्यावर आ. चव्हाण यांनी भाजपाकडे उमेदवारच नाही. त्यांना उमेद्वारच आयातच करावा लागणार असल्याचे सांगितले. यात डॉ. भापकर यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. मात्र त्याला आणखी अवधी असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद नाकारले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. आ. भाऊसाहेब चिकटगाकवर यांच्यावर प्रभारी जबाबदारी देण्यात आलेली आहे. याविषयी विचारले असता, चव्हाण म्हणाले, जिल्हाध्यक्ष होण्यासाठी पक्षाने विचारले होते. मात्र त्यास नकार कळवला असल्याचे सांगितले.