कँटीनचालकाची विद्यार्थ्यास मारहाण
By Admin | Updated: December 22, 2015 00:12 IST2015-12-21T23:47:35+5:302015-12-22T00:12:17+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सायन्स कँटीनमधील कामगारांनी एका विद्यार्थ्यास सोमवारी मारहाण केल्यामुळे

कँटीनचालकाची विद्यार्थ्यास मारहाण
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सायन्स कँटीनमधील कामगारांनी एका विद्यार्थ्यास सोमवारी मारहाण केल्यामुळे संतापलेल्या सुमारे तीनशे- साडेतीनशे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करीत तीन तास मुख्य इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. मारहाण करणाऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, सायन्स कँटीनचा ठेका काही दिवसांपूर्वी मिळालेला कँटीनचालक निविदेत नमूद केलेल्या दरापेक्षा अधिक दराने चहा आणि खाद्यपदार्थ विक्री करीत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. याबाबत काही कुरबुरीही झाल्या होत्या.
सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दरपत्रकाप्रमाणे पदार्थ विक्री करीत नसल्याबद्दल तक्रार करणाऱ्या गौतम जाधव (बायोकेमिस्ट्री विभाग) या विद्यार्थ्याला कँटीनमधील काही कामगारांनी जबर मारहाण केली. हा विद्यार्थी एसएफआयचा कार्यकर्ता आहे.
विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचे समजताच विविध विभागांतील तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी तिकडे धाव घेतली. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठ मुख्य इमारतीसमोर येऊन मारहाणीचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या तसेच विद्यार्थी कल्याण संचालक विभागाच्या विरोधातही घोषणा दिल्या. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे तसेच प्रभारी कुलसचिव डॉ. एम. डी. शिरसाठ हे विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी आले, मात्र विद्यार्थी त्यांचे काही एक ऐकायला तयार नव्हते. सुमारे चार तास ठिय्या आंदोलन चालले. पाच वाजेच्या सुमारास पोलीस आले. यावेळी पोलिसांनीही विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांकडून मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी होत राहिली. सायंकाळी सव्वासात वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. पोेलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.