महसूलच्या रेकॉर्ड रूमबाहेर चोवीस तास खडा पहारा
By Admin | Updated: February 17, 2015 00:42 IST2015-02-17T00:24:11+5:302015-02-17T00:42:07+5:30
औरंगाबाद : वैजापूर उपविभागीय कार्यालयातील रेकॉर्ड रूमला आग लागून त्यातील महत्त्वाचे रेकॉर्ड जळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व तहसीलदारांना

महसूलच्या रेकॉर्ड रूमबाहेर चोवीस तास खडा पहारा
औरंगाबाद : वैजापूर उपविभागीय कार्यालयातील रेकॉर्ड रूमला आग लागून त्यातील महत्त्वाचे रेकॉर्ड जळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व तहसीलदारांना तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. रेकॉर्ड रूमबाहेर शिपाई किंवा होमगार्ड नेमून चोवीस तास पहारा ठेवावा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.
रविवारी वैजापूर उपविभागीय कार्यालयात रेकॉर्ड रूमला आग लागली. त्यात चारशेहून अधिक संचिका खाक झाल्या. उपविभागीय कार्यालयात जमिनीची ४६० अपील प्रकरणे सुरू होती. यापैकी बहुतेक प्रकरणांचे रेकॉर्ड जळून खाक झाले. त्यामुळे ही आग नक्की लागली की जाणीवपूर्वक लावली गेली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व नऊ तहसील कार्यालये आणि पाच उपविभागीय कार्यालयांतील रेकॉर्ड रूमबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. रेकॉर्ड रूममध्ये जमिनींचे वर्षानुवर्षांचे रेकॉर्ड तसेच इतर महसुली दस्तावेज, जमिनीच्या निवाड्यांची कागदपत्रे असतात. ही कागदपत्रे नष्ट झाल्यास अनेक अडचणी उद्भवू शकतील, ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी रेकॉर्ड रूमबाहेर चोवीस तास पहारा ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. त्यासाठी खास होमगार्ड किंवा शिपाई नेमावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.