गप्प बसा़़़ अन्यथा चालते व्हा़़!

By Admin | Updated: July 16, 2014 01:25 IST2014-07-16T00:24:14+5:302014-07-16T01:25:40+5:30

लातूर : पक्षात राहून पक्षातच पर्यायी नेतृत्व तयार करून हवेत गोळीबार करणे ही बाब पक्षविरोधी आहे़

Keep quiet if you run it otherwise! | गप्प बसा़़़ अन्यथा चालते व्हा़़!

गप्प बसा़़़ अन्यथा चालते व्हा़़!

लातूर : पक्षात राहून पक्षातच पर्यायी नेतृत्व तयार करून हवेत गोळीबार करणे ही बाब पक्षविरोधी आहे़ आमच्याकडून कधीच आगळीक होणार नाही़ पण कोणी राजकीयदृष्ट्या आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्ही बिलकूल खपवून घेणार नाही़ दोस्ती जरूर निभावू पण धमकावत असाल तर आम्ही घाबरण्यापैकी नाही़ आम्ही अन्यायाविरूद्ध डरकाळी फोडणारे वाघच आहोत़ ज्यांना पक्षाच्या विचाराने राहयचे असेल तर गुण्यागोविंदाने रहावे, अन्यथा त्यांनी वेगळी चूल मांडायला काहीच हरकत नाही़ आम्ही दहा चुका सहन करू, पण अकराव्या चुकीला माफी नाही, अशा शब्दात पर्यायी नेतृत्वाची तयारी करणाऱ्यांना दिलीपराव देशमुख यांनी ठणकावले़
काँग्रेस पक्षाच्या वतीने लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिबीर मंगळवारी हॉटेल कार्निव्हलच्या सभागृहात घेण्यात आले़ ‘मिशन महाराष्ट्र विधानसभा २०१४’ या बॅनरखाली विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख बोलत होते़
मंचावर राज्यमंत्री अमित देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष धीरज देशमुख, जि़प़चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, अ‍ॅड़ बी़व्ही़ मोतीपवळे, रेणाचे चेअरमन यशवंत पाटील, मांजराचे चेअरमन धनंजय देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन एस़आऱदेशमुख, आबासाहेब पाटील, जगदीश बावणे, विजय देशमुख, जि़प़चे माजी अध्यक्ष मिठाराम राठोड, संतोष देशमुख, प्रतिभा पाटील, पं़स़सभापती मंगलप्रभा घाटगे, नाथसिंह देशमुख, भागवत सोट, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, सुनीता आरळीकर, विश्वंभर मुळे आदींची उपस्थिती होती़
पर्यायी नेतृत्व करणाऱ्यांचा समाचार घेताना आमदार दिलीपराव देशमुख म्हणाले, आम्ही पक्षाशी आणि नेत्यांच्या विचाराशी प्रामाणिक आहोत़ धमक असणाऱ्यांनी दिल्लीत जाऊन निवडणुकीचं तिकिट जरूर आणावं़ त्यांचा आम्ही प्रामाणिक प्रचार करू़ परंतु, पक्षात राहून एका बाजुला पक्षाची मदत मागायची आणि दुसऱ्या बाजूला पर्यायी समांतर नेतृत्वाची तयारी करायची ही बाब योग्य नाही़
लोकनेते विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर यांचे विचार ज्यांना मान्य असतील त्यांनी पक्षात थांबावं़ अन्यथा वेगळी चूल जरूर मांडावी़ काही लोकांना अशा कारनाम्याची सवयच असते़ माध्यमातून आम्हाला धमकावून काहीही मिळणार नाही़ आम्ही काही वेडेगबाळे नाहीत़
साहेबांच्या रूपाने दहा वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद आमच्याकडे होते़ परंतु, आम्ही कोणाला शब्दाने दुखावले नाही़ धमकावणे तर दूरच़ परंतु, आम्हाला कोणी धमकावणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही़ दहा चुका सहन करू पण अकराव्या चुकीला माफी नाही, अशा कठोर शब्दात आमदार दिलीपराव देशमुख यांनी पर्यायी नेतृत्व करणाऱ्यांना फटकारले़ श्रेष्ठी ठरवेल तो उमेदवार निवडून आणूच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़
आमदार वैजनाथ शिंदे, बसवराज पाटील नागराळकर, त्र्यंबकदास झंवर, दत्तात्रय बनसोडे, अ‍ॅड़ बी़व्ही़ मोतीपवळे, माजी आ़ शिवाजीराव पाटील कव्हेकर, धीरज देशमुख, अ‍ॅड़ विक्रम हिप्परकर, यशवंत पाटील, एस़आऱ देशमुख, अ‍ॅड़ त्र्यंबक भिसे आदींची यावेळी समयोचित भाषणे झाली़
प्रास्ताविक अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे यांनी केले़ सूत्रसंचालन चंद्रशेखर दंडिमे यांनी केले़ (प्रतिनिधी)
जिंकण्यासाठी एकसंघपणे लढूया़़़
आतापर्यंतच्या सर्व निवडणुका लोकनेते विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, डॉ़ शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि दिलीपराव देशमुख या कर्तबगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या आणि जिंकल्याही़ यापुढेही याच नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील़ त्या जिंकण्यासाठी एकसंघपणे लढूया, असे राज्यमंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले़
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने नाउमेद न होता़ जोमाने कामाला लागू या़ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्याचा लढा आपल्या बुथ व गावातून करावा़ मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतही सौहार्दपूर्ण नाते जुळवून काम करावे़
मागील काळात माझ्याबद्दल काही गैरसमज व अफवा पसरविण्याचे काम हेतू परस्पर केले आहे़ यापुढे अशा अफवा थांबवाव्यात़ ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हक्काने सूचना कराव्यात़ मतभेद असतील तर ते विसरावेत़ मी बदलतोय्, तुम्हीही बदला़ आपण सर्वजण बदलूया आणि जिंकूया, साहेबांच्या विचारांचा सूर्य पुन्हा उगवेल, यासाठी विचाराची ज्योत पेटवूया, अशी भावनिक साद राज्यमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना घातली़
ग्रामीण आणि शहरी आमदारांचे काम उत्कृष्ट़़़
लातूर ग्रामीण आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील दोन्ही आमदारांचे काम अतिशय चांगले आहे़ पक्षाशी प्रामाणिक आणि नेत्यांच्या विचाराशीही प्रामाणिक हे लोकप्रतिनिधी आहेत़ त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष त्यांचा विचार करील़ पर्यायी नेतृत्वाच्या तयारीत असणाऱ्यांनी पक्षाचा आदेश मान्य नसेल तर त्यांनी खुशाल पक्षातून बाहेर पडावे़ ज्यांना पक्षात रहायचे नाही, ते गेले तर त्यांचा मार्ग वेगळा, आमचा मार्ग वेगळा, असेही दिलीपराव यावेळी म्हणाले़
श्रेष्ठी ठरवतील तो उमेदवाऱ़़
धमक असणाऱ्यांनी दिल्लीत जाऊन निवडणुकीचे तिकीट जरूर आणावं़ त्यांचा आम्ही प्रामाणिक प्रचार करू ़ परंतू पक्षात राहून एका बाजूला मदत मागायची आणि दुसऱ्या बाजूला पर्यायी नेतृत्वाची तयारी करायची़ हे चुकीचे आहे़ वास्तविक पाहता श्रेष्ठी ठरवेल तोच उमेदवार असतो़ तो उमेदवार आम्ही निवडून आणू. शहर विधानसभा असो की ग्रामीण विधानसभा़ श्रेष्ठीच उमेदवार ठरवतील़ ज्यांना इच्छा आहे त्यांनी धमक असेल तर दिल्ली गाठावी, असेही दिलीपराव देशमुख म्हणाले़
९५ च्या निवडणुकीनंतर डिपॉझिट जप्त झाले होते़़़
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांचा पराभव केल्याची ओळख सांंगणाऱ्यांनी नंतरच्या निवडणुकीत स्वत:चे डिपॉझिट जप्त झाले होते, हे जाहीर सांगावे़ पण हे का सांगितले जात नाही, असा सवाल करीत आमदार दिलीपराव देशमुख यांनी कोणाचेही नाव न घेता पर्यायी नेतृत्वाची तयारी करणाऱ्या काँग्रेसमधील इच्छुकांना ठणकावले़
मीच नेतृत्व करणार
आगामी विधानसभा निवडणुकीत मीच नेतृत्व करणार आहे, असेही दिलीपरावांनी ठणकावून सांगितले़

Web Title: Keep quiet if you run it otherwise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.