तीन राजवटीतील २४ हजार ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा
By Admin | Updated: May 18, 2015 00:18 IST2015-05-18T00:13:24+5:302015-05-18T00:18:47+5:30
तेर : दक्षिणेची मथुरा म्हणून परिचित असलेल्या तेरचा इतिहास थेट बौध्द काळापर्यंत जावून पोहचतो. सातवाहन काळात ‘तगर’ या नावाने तेर सर्वत्र परिचीत होते.

तीन राजवटीतील २४ हजार ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा
तेर : दक्षिणेची मथुरा म्हणून परिचित असलेल्या तेरचा इतिहास थेट बौध्द काळापर्यंत जावून पोहचतो. सातवाहन काळात ‘तगर’ या नावाने तेर सर्वत्र परिचीत होते. येथे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय असून, या संग्रहालयात तीन राजवटीतील जवळपास २४ हजार मौल्यवान ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा आजही पहावयास मिळतो.
१९३० साली परदेशातील नागरिक तेरमधील पुरातन मंदिरे व अवशेष पाहण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी टेकडीवरील खापराचे तुकडे गोळा करून नेले. जाताना या लोकांनी या पुरातन खापराचा इतिहास व महत्व येथील लोकांना सांगितले. त्यामुळे येथील लामतुरे यांना या वस्तूमध्ये रुची वाढली. त्यांनी अशी प्राचीन खापरे जमविण्यास सुरवात केली. तेरणा नदीच्या तीरावर सापडलेल्या मूर्तीची कलाकुसर पाहून लामतुरे यांनी त्या वस्तू जतन केल्या. गावातील खेळकर मुलांना पैसे देऊन मिळेल ते अवशेष जमा करून या सापडणाऱ्या वस्तूचा संग्रह त्यांनी केला. २५ वर्षाच्या काळात त्यांनी नाणी, मातीच्या मूर्ती, हस्तीदंताची मूर्ती, शंखाच्या बांगड्या विविध दगडाची व मातीचे निरनिराळ्या आकारातील मणी, नाणी, अलंकार, नाणी बनविण्याचे साचे, रोमन बनावटीचे दिवे, कर्ण भुषण, जुन्या काळातील गहू जमा केले. या ऐतिहासिक वस्तूंमुळे तेर गावाचे नाव जागतिक स्तरावर पोंहचले.
या संग्रहालयात शंखाच्या वस्तू, बांगड्या, मणी यासारखी महिलांची आभूषणे, शंखापासून तयार केलेले अनेक शिल्प पहावयास मिळतात. शिवाय दगडाच्या शिलालेख, जाते, पाटे, वरवंटे आदी दगडी वस्तूही आहेत. नक्षीदार बोळकी, साच्यात तयार केले व नक्षीदार बूड असलेले लाल रंगाचे उत्कृष्ट बोळके व त्यावर असलेली नक्षी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संग्रहालयामध्ये असलेल्या या ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच येथे वर्दळ असते. कमलासनादेवी ही प्रतिमा कलात्मकदृष्ट्या अप्रतिम आहे. या मूर्तीच्या पायात तोडे, कमरेला मेखला असून, पारदर्शक वस्त्र परिधान केले आहेत. हस्तीदंताची स्त्रीमूर्ती १२.५ सेमी उंचीची असून, चेहरा सुरेख नसला तरी बांधा सडपातळ असल्यामुळे ही मूर्ती कमनीय दिसते. या मूर्तीचे मोठे डोळे, कानात डूल, दंडावर मण्यांचा अलंकार, कमरेभोवती नक्षदार मेखला घालण्यात आला आहे. या सर्व मौल्यवान वस्तू जगाच्या समोर जिवंत ठेवण्यात कै. रामलिंगप्पा लामतुरे यांचा मोलाचा वाटा आहे. या वस्तू पर्यटक, अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने येथे कै. रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुरावस्तू संग्रहालय उभारले असून, याचा लाभ ठिकठिकाणचे पर्यटकही घेतात.