केबीसीच्या एजंटानी कमविले लाखो रुपये
By Admin | Updated: July 19, 2014 00:39 IST2014-07-19T00:15:05+5:302014-07-19T00:39:11+5:30
विजय चोरडिया, जिंतूर पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयाला गंडा घालण्यासाठी जिंतुरात साखळी कार्यरत होती.

केबीसीच्या एजंटानी कमविले लाखो रुपये
विजय चोरडिया, जिंतूर
पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयाला गंडा घालण्यासाठी जिंतुरात साखळी कार्यरत होती. या एजंटांनी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व नातेवाईकांना योजनेत सहभागी करुन लाखो रुपयांची माया जमविली.
तालुक्यामध्ये मागील एक वर्षापासून केबीसीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले. ग्रामीण भागात सुशिक्षित बेरोजगार, शिक्षक, डॉक्टर, प्राध्यापक यांनी शेतकरी व त्या त्या भागातील सदन लोकांना या योजनेत ओढले. विशेष म्हणजे, या एजंटांना पाच हजार रुपयांपासून १ कोटी रुपयाच्या बंगल्यापर्यंत कंपनीने आमिष दाखविले होते. सदस्यांच्या साखळीवर ही बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामुळे या लालसेपोटी एजंटांनी स्वत:चे नातेवाईक, मित्रमंडळी यांना या योजनेत ओढले. योजना बंद पडणार आहे, याबाबतची माहिती एजंटांनाही होती. परंतु, आपला लाभ होत असल्याने इतरांना फसविण्यात गैर काय, या उक्तीप्रमाणे एजंटांनी दिसेल त्याला कंपनीत ओढण्याचा प्रयत्न केला. साधारणत: या योजनेत तालुक्यातील १० हजार लाभार्थी गंडविल्या गेले आहेत. लाभार्थ्याची ही रक्कम १० कोटीच्या घरात आहे. तालुक्यामध्ये ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही एजंटाची मोठी साखळी आहे. विशेषत: शिक्षक, डॉक्टर, कर्मचारी यांच्या माध्यमातून ही योजना शहरातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली. जिंतूर शहरातही एक ते दीड कोटी रुपयांची रक्कम योजनेत गुंतविली आहे. गुंतवणूक करीत असताना लाभार्थ्यांनी अवघ्या काही दिवसात रक्कम पाचपट मिळत आहे, या आमिषाला बळी पडून या योजनेची साखळी वाढत गेली. योजनेमध्ये महिला एजंटांची संख्याही मोठी आहे. काही महिलांनी तर घरातील कर्त्या व्यक्तींना अंधारात ठेवून योजनेमध्ये पैसे गुंतविले. ही योजना बंद पडल्याने या महिलांसमोर मोठा प्रश्न पडला आहे.
एजंटाच्या मालमत्तेवर टाच
लाभार्थ्यांना योजनेत सहभागी व्हावे, यासाठी एजंटांनी वेगवेगळे आमिष दाखविले. काही एजंटांनी १०० रुपयांच्या बॉन्डवर स्वत:ची मालमत्ता लिहून दिली. काहींनी स्वत:चे धनादेश लिहून दिले. या सर्व प्रकारामुळे लाभार्थी पैशासाठी एजंटाकडे तगादा लावत आहेत. परिणामी तालुक्यातून अनेक एजंट सध्या फरार झाल्याचे समजते. एजंटांनी कमविलेली मालमत्ता ही जप्त करुन लाभार्थ्यांचे पैसे देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
सुशिक्षितही गोवल्या गेले
योजनेमध्ये पैसा गुंतविणारे सुशिक्षित व्यक्ती आहेत. या व्यक्तींना भविष्यात कंपनी बुडणार आहे, याची जाणीव होती. परंतु, किमान आपण गुंतविलेले पैसे मिळतील, या आशेवर त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. यात प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक, वकील व कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आज या लोकांवर पश्चाताच करण्याची वेळ आली आहे.