केबीसीने करोडोंना गंडविले
By Admin | Updated: July 18, 2014 01:50 IST2014-07-18T00:25:14+5:302014-07-18T01:50:03+5:30
अकोला देव : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव व परिसरातील गावांमध्ये केबीसी मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने करोडो रूपयांचा चुना लावल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ मोठी उडाली आहे.

केबीसीने करोडोंना गंडविले
अकोला देव : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव व परिसरातील गावांमध्ये दाम दुप्पट, तिप्पट देण्याचे आमिष दाखवून करोडपती करण्याच्या बहाण्याने केबीसी मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सर्वसामान्य जनतेला करोडो रूपयांचा चुना लावल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ मोठी उडाली आहे.
केवळ अकोला देव या गावामधून गुंतवणुकदरांनी जवळपास दीड कोटी रूपये गुंतविल्याचे गुंतवणूकदारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सुरूवातीस अनेक जणांना या कंपनीने आमिष दाखवून थोडे फार पैसे चेक द्वारे दिले होते. तेव्हा पासून अनेक जणांनी आपल्याला दुप्पाट, तिप्पट रक्कम मिळणारच या आशेने मोठी गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक करण्यासाठी कंपनीचे एजंट हे नाना प्रकारचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवित होते. यामध्ये १७ हजार रूपये गुंतवणूक केल्यास सहा महिन्यानंतर १० हजार व तीन महिन्यानंतर १७ हजार रूपये परत. ८६ हजार रूपये गुंतवणूक केल्यास पहिल्या सहा महिन्या ८६ हजार व १८ महिन्यात ८६ हजार आणि ३६ महिन्यात ८६ हजार म्हणजे तीन वर्षात तिनपट रक्कम तर ४ लाख ३६ हजार रूपयांची गुंतवणूक केल्यास चार महिन्यात ४ लाख ३६ हजार रूपये परत १२० महिन्यात ४ लाख ३६ हजार रूपये म्हणजे चार पट रक्कम हे आमिष म्हणून दाखविले जात होते. हाच गुंतवणूकदारांचा गैरफायदा घेऊन अनेकांना चुना लागल्याने एजंट सुध्दा फरार झाले आहे. एवढी मोठी फसवणुक होऊन सुध्दा गुंतवणुकदार तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने आजूनही आमचे पैसे परत मिळतील या आशेवर गुंतवणूकदार आहेत. या केबीसी कंपनीने जाहिरात बाजी करून अनेकांना फसविले. बनावट कंपनीचे मालक, संचालक एजंट यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी रामराव मोढेकर, बाबूराव सवडे, मनोहर सवडे यांनी केली आहे. (वार्ताहर)
पोलिसांत तक्रार द्यावी...
दरम्यान, या प्रकाराने अकोलादेव परिसरातील हजारो गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेकजण धास्तावले आहेत. गुंतवणूकदारांनी न घाबरता पोलिसात तक्रार दिल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. असे टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि भानुदास निंभोरे यांनी सांगितले.