पूर्णेत केबीसीने शेकडो लोकांना गंडविले
By Admin | Updated: July 24, 2014 00:22 IST2014-07-23T23:41:46+5:302014-07-24T00:22:27+5:30
पूर्णा : केबीसी या नाशिक येथील अर्थव्यवहार करणाऱ्या कंपनीत हजारो लोकांनी पैसे गुंतविले आहेत. शेकडो सुशिक्षित नागरिक या जाळ्यात फसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
पूर्णेत केबीसीने शेकडो लोकांना गंडविले
पूर्णा : केबीसी या नाशिक येथील अर्थव्यवहार करणाऱ्या कंपनीत हजारो लोकांनी पैसे गुंतविले आहेत. शेकडो सुशिक्षित नागरिक या जाळ्यात फसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
चार वर्षांपासून केबीसीचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत. सहा महिन्यांत दुप्पट पैसे देण्याच्या लालसेने सामान्य नागरिकांसह अनेक सुशिक्षितांनी या कंपनीत पैसे गुंतविले आहेत. भाऊसाहेब चव्हाण यांनी कृष्णा भाऊसाहेब चव्हाण अर्थात केबीसी नावाची आर्थिक व्यवहार कंपनी सुरू केली. नाशिकसह औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड यासह विदर्भातही जिल्हास्तरावर अनेक एजंट तयार झाले. या एजंटाच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी खाजगी शाळांमधील शिक्षक, जि़ प़ चे कर्मचारी यांच्यासह अनेक लोकांनी दुप्पट पैशाच्या आमिषाला बळी पडून लाखो रुपये गुंतविले आहेत. कोन बनेगा करोडपती या नावाचा संदर्भ घेऊन केबीसी कंपनी स्थापण्यात आली होती. दुप्पट पैशाच्या अमिषाला बळी पडून पूर्णा व खुजडा, देऊळगाव दुधाटे, चुडावा, माखणी, गोळेगाव, वझूर, ताडकळस, पांढरी, कावलगाव यासह अनेक गावातील नागरिकांनी स्वत:च्या जमिनी, नोकरीतील पैसे, दागिणे गहाण ठेऊन केबीसी या कंपनीत पैसे गुंतविले आहे. मागील सहा महिन्यांपासून दुप्पट पैसे तर आलेच नाही, परंतु एजंटांनी पैसे येणार या नावाखाली गुंतवणूक सुरू ठेवली होती. कंपनी बंद पडल्याचे लक्षात आल्यावर अनेक गुंतवणूकदार जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे जाऊन आले. त्यापैकी काही लोकांनी तक्रार दाखल केली. परंतु शेकडो लोकांनी अजून तक्रारी दाखल केल्या नाहीत. कंपनी सुरू होईल, या आशेपायी अनेक लोक तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे शहर व तालुक्याचा गुंतवणुकीचा किती आकडा आहे, हे समजू शकत नाही. (वार्ताहर)