कथ्थक, ओडिसीने मन मोहिले
By Admin | Updated: January 17, 2016 00:03 IST2016-01-16T23:27:12+5:302016-01-17T00:03:34+5:30
औरंगाबाद : काव्यानुसार सतत बदलणारे नर्तकांच्या चेहऱ्यावरील विविध हावभाव... हात व पायाचे वायुवेगाने थिरकणे, तेवढीच सुंदर वाद्यसंगत, अशा अभिजात नृत्यशैलीने शारंगदेव महोत्सवाचा दुसरा दिवस गाजविला.

कथ्थक, ओडिसीने मन मोहिले
औरंगाबाद : काव्यानुसार सतत बदलणारे नर्तकांच्या चेहऱ्यावरील विविध हावभाव... हात व पायाचे वायुवेगाने थिरकणे, तेवढीच सुंदर वाद्यसंगत, अशा अभिजात नृत्यशैलीने शारंगदेव महोत्सवाचा दुसरा दिवस गाजविला. कथ्थक व ओडिसी नृत्यशैलीच्या मनमोही सादरीकरणाने रसिकांना परमानंद मिळवून दिला.
महागामी संस्थेच्या तीनदिवसीय शारंगदेव महोत्सवात शनिवारी दुसऱ्या दिवशी एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृह रसिकांनी बहरून गेले होते आणि रंगमंचावर शिववंदना करण्यासाठी पार्वती दत्ता अवतरल्या. भारतातील ८ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी कथ्थक एक प्राचीन नृत्य प्रकार. १४ व्या शतकात देवगिरी किल्ला येथे गोपाल नायक यांनी रचलेली शिववंदना तेवढ्याच तल्लीनतेने पार्वती दत्ता यांनी सादर केली. नृत्य पाहण्यात रसिक ब्रह्मानंदी टाळी लागावी एवढे तल्लीन झाले होते... यानंतर त्यांच्या शिष्यांनी प्राचीन बंदिशवर आधारित तालबसंत नृत्य सादर केले.
वसंत ऋतू आल्यावर सृष्टीत नवचैतन्य निर्माण होते. सर्वत्र मंगलमय वातावरण पसरते... असे वातावरण या कथ्थक नृत्यातून सादर करण्यात नृत्यांगना यशस्वी ठरल्या. चेहऱ्यावरील विविध भावमुद्रा आणि पदन्यासाने सारे भारावले होते.