अखेर कारगिल स्मृतिवनाचा करार
By Admin | Updated: September 18, 2014 00:42 IST2014-09-18T00:36:20+5:302014-09-18T00:42:08+5:30
औरंगाबाद : मनपाच्या गारखेडा परिसरातील ८ एकर जागेवर साडेतीन कोटी रुपये खर्चून कारगिल स्मृतिवन व उद्यान विकसित करण्याची संचिका खा. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधाला डावलून भाजपाने मंजूर करून घेतली

अखेर कारगिल स्मृतिवनाचा करार
औरंगाबाद : मनपाच्या गारखेडा परिसरातील ८ एकर जागेवर साडेतीन कोटी रुपये खर्चून कारगिल स्मृतिवन व उद्यान विकसित करण्याची संचिका खा. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधाला डावलून भाजपाने मंजूर करून घेतली आहे. जिल्हा सैनिक बोर्ड व पालिकेत करार झाला असून, आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्या जागेवर राज्य सैनिक मंडळाने राज्यपालांच्या नावाने नामफलक लावला. भाजपाने शिवसेनेला या प्रकरणात जोरदार हबाडा दिला आहे. मनपा उपायुक्त आशिष पवार, उपअभियंता एस.पी. खन्ना व राज्यपालांतर्फे शिवकुमार कहाळेकर यांनी ४ सप्टेंबर रोजी करार केला आहे. करारात वेगवेगळ्या १२ अटी व शर्तींचा समावेश आहे.
त्या उद्यानाच्या कामावरून शिवसेना- भाजपामध्ये ‘कायद्या’चा कलह निर्माण झालेला असताना आज नामफलक लागला आहे. सेनेने या प्रकरणात तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यावर टीकेची झोड उठविली होती.
आयुक्तांनी बदली होण्यापूर्वी त्या उद्यानाच्या जागेचा करार केल्यामुळे बुधवारी सैनिक बोर्डाने जागेचा ताबा घेतला. या प्रकरणात युतीमध्ये राजकीय खटके उडणार असून, भाजपाने पाठीत खंजीर खुपसल्याची भावना शिवसेनेत निर्माण झाली आहे. महापौर कला ओझा यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली नाही.
असा आहे विरोध
जिल्हा सैनिक बोर्डाकडे जागा देण्याचा प्रस्ताव सभेऐवजी स्थायी समितीने मंजूर केल्यामुळे युतीमध्ये आठ महिन्यांपासून राजकारण पेटले आहे.
८ एकर इतके त्या जागेचे क्षेत्रफळ आहे. ती मनपाच्या नावावर नाही. टीडीआरचा मुद्दाही सेनेने त्या प्रकरणात उपस्थित केला होता.