छत्रपती संभाजीनगरची कर दे धमाल; रविवारच्या दिवशी धावपटूंनी गाजवले मैदान

By जयंत कुलकर्णी | Published: December 18, 2023 12:25 AM2023-12-18T00:25:21+5:302023-12-18T00:25:47+5:30

प्राजक्ता, विवेकने जिंकली लोकमत महामॅरेथॉन

Kar De Dhamaal of Chhatrapati Sambhajinagar; Runners stormed the field | छत्रपती संभाजीनगरची कर दे धमाल; रविवारच्या दिवशी धावपटूंनी गाजवले मैदान

छत्रपती संभाजीनगरची कर दे धमाल; रविवारच्या दिवशी धावपटूंनी गाजवले मैदान

जयंत कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: वंदे मातरम्, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणेच्या निनादात चैतन्यपूर्ण वातावरणात रविवारी झालेली २१ कि.मी. अंतराची लोकमत महामॅरेथॉन नागपूरची प्राजक्ता गोडबोले आणि कोल्हापूरचा विवेक मोरे यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष गटांत जिंकली. पहाटे पाच वाजून ५० मिनिटांनी महामॅरेथॉनला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पूर्ण छत्रपती संभाजीनगरच पूर्ण महामॅरेथॉनमय झाले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे देशभरातूनच नव्हे तर परदेशातील धावपटूंचा सहभाग हे यंदाच्या महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले. महिला गटांत पहिल्या दहा कि.मी.मध्ये सावध सुरुवात केल्यामुळे पिछाडीवर असलेल्या प्राजक्ताने दुसऱ्या फेरीत मात्र, आपला धावण्याचा वेग वाढवताना एक तास २० मिनिटे २५ सेकंदासह अव्वल स्थानावर कब्जा केला. प्राजक्ताप्रमाणेच कोल्हापूरचा विवेक मोरे हा पहिल्या दहा कि.मी. अंतरात मागे होता. मात्र, त्याने पुढील दहा कि.मी.मध्ये जोरदार मुसंडी मारली आणि पुरुष गटांत एक तास नऊ मिनिटे २४ सेकंद वेळ नोंदवताना अव्वल स्थान पटकावले.

निओ व्हेटरन महिला गटात मुंबई महामॅरेथॉनमध्ये तब्येत बरी नसल्यामुळे दुसऱ्या स्थानावर समाधान मानाव्या लागणाऱ्या परभणीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्योती गवते हिने मात्र, छत्रपती संभाजीनगरात आपली कामगिरी उंचावली. तिने २१ कि.मी. अंतर एक तास ३३ मि. आठ सेकंदासह विजेतेपद पटकावले.  पुरुषांमध्ये रमेश गवळीने एक तास १२ मिनिटे वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. पुरुष व्हेटरन गटात ठाणे येथील कामगिरीचीच पुनरावृत्ती करताना भास्कर कांबळेने एक तास २० मिनिट व ३८ सेकंदासह पहिला क्रमांक पटकावला. महिला गटात पल्लवी मूगने मुंबई महामॅरेथॉनपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथील लोकमत महामॅरेथॉन गाजवताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. १० कि.मी. अंतराची पुरुष गटांतील शर्यत हरयाणातील गाझियाबाद येथील अश्विन याने जिंकली. त्याने ३१ मि. १८ सेकंद वेळ नोंदवला तर महिला गटांत दिल्ली येथील निशा कुमारी अव्वल ठरली.

स्पर्धेतील विजेते

२१ किमी अर्धमॅरेथॉन

  • खुला गट : पुरुष : १. विवेक मोरे, २. सुमित सिंग, ३. आकाश जयन. 
  • महिला : १. प्राजक्ता गोडबोले, २. आरती पावरा, ३. परिमला बाबर.

-----

निओ वेटरन गट (३६-४५ वर्षांपर्यंत)

  • पुरुष : १. रमेश गवळी, २. राकेश यादव, ३. विवेक अय्यर.
  • महिला : १. ज्योती गवते, २. रंजना  पवार, ३. गुंजन पाटील.

-----

व्हेटरन गट (४६ वर्षांवरील)

  • पुरुष  : भास्कर कांबळे, २. आर. मोनी, ३. कृष्णा भद्रेवार. 
  • महिला :  १. डॉ. पल्लवी मूग, २. शीतल संघवी, ३. विठाबाई कच्छवे.

-----

  • डिफेन्स : पुरुष : १. अविनाश पटेल, २. शैलेश गंगोडा, ३. शिवाजी हाके.
  • महिला : १. प्रिती चौधरी, २.  प्रियांका पाइकराव, ३. पूजा पडवी.

-----

१० किमी मॅरेथॉन खुला गट

  • पुरुष : १. अश्विन, २. आसिफ खान,  ३. रोहित चव्हाण.
  • महिला : १. निशा कुमारी, २. आकांक्षा शेलार, ३.अमृता गायकवाड.

-----

निओ वेटरन (३६-४५ वर्षांपर्यंत) :

  • पुरुष : १. अक्षय कुमार, २. चंद्रवीर सिंग, ३. सुनील सोनवणे.
  • महिला : १. शारदा काळे, २. मिनाज नदाफ, ३. पूनम सूर्यवंशी

-----

  • व्हेटरन (४६ वर्षांवरील) : १. अश्विनी आचार्य, २. समीर कोलया, ३. सतीश यादव.
  • महिला : १. डॉ. इंदू टंडन, २, परिणीता खैरनार, ३. सीमा वट्टमवार.


प्राजक्ताची छत्रपती संभाजीनगरांत हॅट्ट्रिक

नागपूरची धावपटू प्राजक्ता गोडबोले हिला छत्रपती संभाजीनगर येथील लोकमत महामॅरेथॉन नेहमीच लकी ठरली आहे. तिने सलग तिसऱ्यांदा लोकमत महामॅरेथॉन जिंकली. लोकमत समूहाचे महामॅरेथॉनचे उत्कृष्ट नियोजन असते. छत्रपती संभाजीनगरात धावण्याचा अनुभव असल्याने त्याचा लाभ आपल्याला होतो, असे प्राजक्ता गोडबोलेने सांगितले.

लोकमत महामॅरेथॉनमुळे निघतो डाएटचा खर्च

कोल्हापूरचा विवेक मोरे हा गतवर्षी छत्रपती संभाजीनगरातील महामॅरेथॉनमध्ये दुसरा होता. यंदा त्याने कामगिरी उंचावताना नंबर वनवर झेप घेतली. यावर्षी चांगला सराव असल्यामुळे आपण २१ कि.मी. अंतर सहज पार केल्याचे सांगितले. प्रतिस्पर्धी सुमेध सिंग सुरुवातीला पुढे होता, मात्र त्यानंतर आपण मुसंडी मारली.  लोकमत महामॅरेथॉनमुळे आपला डाएटचा खर्च निघतो, असे त्याने सांगितले.

Web Title: Kar De Dhamaal of Chhatrapati Sambhajinagar; Runners stormed the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.