कानडा वो विठ्ठलू करनाटकू येणे मज लावियेला वेधू़़़
By Admin | Updated: July 3, 2017 00:35 IST2017-07-03T00:32:48+5:302017-07-03T00:35:30+5:30
नांदेड : पावसाची रिमझिम अन् पार्श्वगायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल आवाजातील भक्तीगीत, भावगीत आणि प्रेमगीतांच्या मैफीलीत रसिक ओलेचिंब झाले़

कानडा वो विठ्ठलू करनाटकू येणे मज लावियेला वेधू़़़
श्रीनिवास भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पावसाची रिमझिम अन् पार्श्वगायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल आवाजातील भक्तीगीत, भावगीत आणि प्रेमगीतांच्या मैफीलीत रसिक ओलेचिंब झाले़ त्यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केलेल्या कानडा वो विठ्ठलू करनाटकू येणे मज लावियेला वेधू़़़ या गाण्याने नांदेडकर भक्तीरसात तल्लीन झाले़
आषाढी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी वैशाली सामंत यांचा संगीतरजनी हा कार्यक्रम पार पडला.
मराठी भाषेसह बंगाली, गुजराथी, भोजपुरी, आसामी, तमिळ, तेलगू भाषांतून दोन हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या सामंत यांनी नांदेडकरांच्या प्रतिसादाचे कौतुक केले़
ऐका दाजिबा़़़ या गीताने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या वैशाली सामंत यांनी आजच्या संगीत मैफलीची सुरूवात गुरूवाणीने केली़ एक ओंकाऱ़़़या स्वरांचा आवाज परिसरात घुमताच टाळ्यांचा कडकडाट झाला़
पारंपरिक संगीताचा बाज घेऊन लोकप्रिय झालेल्या अनेक गाण्यांचा गायनाचा इतिहास श्रोत्यांसमोर मांडत वैशाली सामंत यांनी आपल्या सुरेल आणि दमदार आवाजाने नांदेडकर रसिकांना जिंकले़ ही गुलाबी हवा़़़ वेड लावी जीवा़़़ या गाण्यावर अख्या सभागृहाने ठेका धरला़
गृहराज्य मंत्री दीपक केसरकर हे सभागृहातून निघाले असतांना वैशाली सामंत यांनी त्यांना विनंती करून थांबविले आणि आपल्या दमदार आवाजातील एकविका आई तु डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी़़़ हे गीत ऐकविले़ या गाण्याने सभागृहामध्ये उत्साह वाढला़ यानंतर हर्षीत अभिराज यांनी संगीतबद्ध केलेले अन् ना़ धो़ं महानोर यांनी लिहिलेले दूरच्या राणात केळीच्या बनात हे गीत सादर केले़
रेश्माच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला हात नगा लावू माझ्या साडीला़़़ ही शांता शेळके यांनी लिहिलेली लावणी गावून टाळ्या अन् शिट्या साथ मिळविली़
दरम्यान, संगीत रजनीचे उद्घाटन गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले़ यावेळी आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर, आ़ सुनील शिंदे, आयोजक आ़हेमंत पाटील, शंकुतला अहिरराव, धोंडू पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मिना उपस्थित होते़