कामधेनू योजना कागदावरच
By Admin | Updated: August 1, 2014 01:05 IST2014-08-01T00:41:52+5:302014-08-01T01:05:22+5:30
कडा : आष्टी तालुक्यात कामधेनू दत्तक योजना पशुवैद्यकीय विभागाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेतील उपक्रम अनेक ठिकाणी कागदोपत्रीच होत असल्याने शेतकऱ्यांना ना सल्ला मिळत आहे
कामधेनू योजना कागदावरच
कडा : आष्टी तालुक्यात कामधेनू दत्तक योजना पशुवैद्यकीय विभागाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेतील उपक्रम अनेक ठिकाणी कागदोपत्रीच होत असल्याने शेतकऱ्यांना ना सल्ला मिळत आहे ना जनावरांना औषध. एकंदर या योजनेचा तालुक्यात बोजवारा उडाला असल्याने शासनाच्या उद्देशालाच खो बसल्याचे दिसून येत आहे.
दुग्धव्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी, शेतकरी किंवा पशुधन पालकास दुधाळ जनावरांचे संगोपन करण्यासाठी परिपूर्ण माहिती मिळावी, पशुधन निरोगी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना सल्ला द्यावा, यासह पशुखाद्य, लसीकरण, विविध शिबिरे, गांडूळ खत प्रकल्प निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे, आधुनिक गोठ्याबद्दल माहिती देणे, शेतकऱ्यांची सहल आयोजित करुन नवीन तंत्रज्ञान अवगत करून देणे आदींविषयी काम करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कामधेनू दत्ता योजना राबविण्यात येत आहे.
पशुपालन हा शेतीला पूरक व्यवसाय न राहता शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय व्हावा व शेतकऱ्यांची दुग्धोत्पादनासह इतर कारणांनी आर्थिक प्रगती व्हावी यासाठी ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. ज्या गावातील दुधाळ जनावरांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे अशा गावांचा समावेश जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशीवरून या योजनेत करण्यात येतो.
आष्टी तालुक्यातील वाघळूज, घाटा, सालेवडगाव, कोयाळ, नांदा, बळेवाडी, मातकुळी, मांडवा या गावांचा समावेश कामधेनू दत्तक योजनेत करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या गावांचा या योजनेत समावेश असला तरी येथील पशुपालकांना मात्र कोणत्याच सुविधा मिळालेल्या नाहीत. तसेच ना मार्गदर्शन मिळाले न जनावरांसाठी लसीकरण झाले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केला आहे.
वास्तविक पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी शिबिरे आयोजित करणे क्रमप्राप्त होते. तसेच पावसाळ्यासह इतर दिवसात लसीकरण करणे महत्वाचे होते. गंभीर बाब म्हणजे या योजनेचा उद्देश दुग्धोत्पादन वाढविणे हा होता. मात्र यासाठी कोणीच प्रयत्न केल्याचे दिसून आले नसल्याचे राम खाडे यांनी सांगितले.
या संदर्भात तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक राठोड यांना विचारले असता, ते म्हणाले की, या योजनेतील कामाची चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करू.